चिपळूणचे सांस्कृतिक वातावरण भावणारे
By Admin | Updated: October 6, 2015 23:46 IST2015-10-06T21:57:13+5:302015-10-06T23:46:44+5:30
विनायक राऊत : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरचा पुरस्कार वितरण सोहळा

चिपळूणचे सांस्कृतिक वातावरण भावणारे
चिपळूण : येथील सांस्कृतिक आणि साहित्यिक वातावरण मनाला अधिक भावणारे आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन चिपळूणकरांनी यशस्वी केले ही त्यांच्या कार्याची पावती आहे. महाराष्ट्र ही विरांची भूमी आहे. ज्ञानोबा, तुकोबांच्या भूमीने मराठी मनाला उभारी दिली आहे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले. चिपळुणातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरचा पुरस्कार वितरण सोहळा ब्राह्यण सहाय्यक संघाच्या सभागृहात खासदार राऊत यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाला आमदार सदानंद चव्हाण, ग्रंथालयाचे अध्यक्ष आप्पा जाधव, कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, मधुसुदन केतकर आदींसह ग्रंथप्रेमी उपस्थित होते. या सोहळ्यात डॉ. क्षेमा थत्ते यांना यमुनाबाई मालशे पुरस्कार, सांगलीचे आप्पा गाडगीळ यांना द. पा. साने (वकील) ग्रंथमित्र पुरस्कार, डॉ. शीला रेडीज, मनोहर चितळे यांना डॉ. मो. गो. कानडे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
खासदार राऊत पुढे म्हणाले की, पीएच. डी.सुध्दा विकत घेणारी आणि विकणारी मंडळी अवतीभोवती वावरत असताना ‘लोटिस्मा’सारखी संस्था वाचकांना उत्तम ग्रंथांच्या माध्यमातून सुसंस्कृत करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ. थत्ते यांनी जुन्या आठवणी सांगून बदलते चिपळूण उपस्थितांसमोर उभे केले.
उत्तम पुस्तके वाचण्यासाठी ‘लोटिस्मा’चा कसा उपयोग झाला याबद्दल शीला रेडीज यांनी तर गेली ८ वर्षांहून अधिक काळ ‘लोटिस्मा’शी संबंधित असलेले मनोहर चितळे यांनी वाचनालयाचा धार्मिक आणि वैचारिक ग्रंथसंग्रह अप्रतिम असल्याचे सांगितले. गाडगीळ यांनी सांगली येथे गणेश वाचनालय चालवताना केलेल्या समाजकार्याबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन अंजली बर्वे यांनी तर आभार मधुसुदन केतकर यांनी मानले. (वार्ताहर)
अखिल भारतीय साहित्य संमेलन चिपळूणकरांनी यशस्वी केले.
ज्ञानोबा, तुकोबांच्या भूमीने मराठी मनाला उभारी दिली.
पीएच. डी. सुद्धा विकत घेणारी आणि विकणारी मंडळी.
क्षेमा थत्ते यांना यमुनाबाई मालशे पुरस्कार.
ग्रंथमित्र पुरस्कार, कानडे पुरस्काराचेही वितरण.