पाणीपुरवठ्याला ‘सेस’चा आधार
By Admin | Updated: February 19, 2015 23:38 IST2015-02-19T23:05:29+5:302015-02-19T23:38:27+5:30
जिल्हा परिषद : दुरुस्तीची कामे होणार आता पूर्ण; हजारो लोकांचा पाणीप्रश्न सुटणार

पाणीपुरवठ्याला ‘सेस’चा आधार
रत्नागिरी : ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याच्या अनेक योजना दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा परिषद सेस फंडाच्या २४ लाख ६० हजार रुपयांच्या अनुदानातून पाणी पुरवठ्याच्या योजनांची दुरुस्ती, तर काही ठिकाणी नवीन विंधन विहिरींची खोदाई करण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो लोकांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.जिल्ह्यात पावसाळ्यातील महापूर व अतिवृष्टीमुळे नळपाणी पुरवठा योजना, विहिरी व तळी यांचे नुकसान झाले होते. १७ गावांतील ५६ योजना नादुरुस्त झाल्या होत्या. त्यामध्ये नळपाणी पुरवठा योजना - २४, विहिरी - २२, तळी - ६ आणि इतर ४ कामांचा समावेश आहे. अतिवृष्ठीत नादुरुस्त झालेल्या योजनांमुळे येथील नागरिकांचे पाण्यासाठी हाल झाले होते. अनेक ठिकाणचा पाणी पुरवठा बंद झाला होता. नुकसानीमध्ये नळपाणी पुरवठा योजनांचे ५६ लाखांचे, विहिरींचे ९८ लाख ५० हजार रुपयांचे, तळ्यांचे २९ लाख रुपयांचे आणि इतर किरकोळ २२ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या योजनांच्या दुरुस्तीसाठी २ कोटी रुपयांची आवश्यकता असून, तो प्रस्ताव अद्यापही शासनाकडे पडून आहे. अतिवृष्टीतील नुकसानीशिवाय जिल्ह्यात अनेक योजना नादुरुस्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना असूनही त्यांच्या नादुरुस्तीमुळे लोकांना टंचाईची अधिक झळ बसते. अतिवृष्टीमध्ये नादुरुस्त झालेल्या पाणी पुरवठ्याच्या योजनांव्यतिरिक्त इतरही अनेक योजना नादुरुस्त आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना उन्हाळ्यातच नव्हे; तर इतर दिवसांमध्ये पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दुरुस्तीसाठी अनुदान देण्यात येते. चालू आर्थिक वर्षामध्ये सेस फंडातून ग्रामीण भागातील नादुरुस्त योजनांसह नवीन विंधन विहिरी व अन्य कामे घेण्यात येणार आहेत.
सेसफंडातून अशी विविध प्रकारची १९ कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी २४ लाख ६० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ही कामे जिल्हा परिषदेच्या सेसच्या सन २०१४-१५ च्या आराखड्यामध्ये घेण्यात आली आहेत. त्यांना मंजुरीही देण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून पाणी पुरवठ्याची ही कामे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होती. त्यांना अनुदान मिळत नव्हते. त्यामुळे ही कामे आता सेसच्या अनुदानातून करण्यात येणार आहेत. दुरुस्तीची कामे झाल्यास लोकांचे पाण्यापासून होणारे हाल दूर होणार आहेत. (शहर वार्ताहर)