वेळासमध्ये पट्टेरी वाघाचे कातडे जप्त
By Admin | Updated: July 16, 2016 23:33 IST2016-07-16T23:04:44+5:302016-07-16T23:33:24+5:30
एकास कोठडी : धागेदोरे हाती लागण्याची शक्यता

वेळासमध्ये पट्टेरी वाघाचे कातडे जप्त
देव्हारे : कासवांचे गाव असा नावलौकिक मिळविलेल्या वेळास (ता. मंडणगड) गावामध्ये वाघाचे कातडे मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शैलजा शशिकांत सातनाईक (रा. नारायण नगर, वेळास, सध्या मुंबई) यांच्या घरी हे कातडे सापडले असून, त्यांच्या घराची देखभाल करणाऱ्या दत्तात्रय सुडकोजी भुवड (नारायण नगर) याला वन खात्याने अटक केली आहे. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. या प्रकरणात अनेक धागेदोरे हाती मिळण्याची अपेक्षा वन खात्याकडून व्यक्त केली जात आहे.सातनाईक यांच्या घरी वाघाचे कातडे असल्याची गुप्त माहिती चिपळूण वन विभागाला शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी मिळाली होती. यावरून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सातनाईक यांच्या घराची पाहणी केली. मात्र, घर बंद होते. या घरातील सर्वजण मुंबईत राहत असल्याची माहिती वन अधिकारी विकास जगताप यांना चौकशीदरम्यान मिळाली. या घराची देखरेख करणारा दत्तात्रय भुवड याच्याकडे घराची चावी असल्याचेही त्यांना समजले.
शनिवारी सकाळी वन अधिकारी जगताप व त्यांचे कर्मचारी यांनी वेळास गावचे पोलिस पाटील, सरपंच तसेच दोन पंचांसमक्ष या घराचे कुलूप उघडून घराची पाहणी केली. त्यावेळी घरातील एका खोलीमधे पंख्याच्या खाली चटईवर वाघाचे कातडे सुकत ठेवले असल्याचे त्यांना आढळले. या कातड्याबाबत दत्तात्रय भुवड याच्याकडे चौकशी केली असता, या घराच्या मालक शैलजा सातनाईक या वीस दिवसांपूर्वी गावी आल्या होत्या व त्यांनी हे कातडे आणले असल्याचे त्याने सांगितले.
पंचनामा करून वन अधिकाऱ्यांनी हे कातडे ताब्यात घेतले. दत्तात्रय भुवड हा एक वर्षापासून या घराच्या व बागेच्या देखरेखीचे काम करीत आहे. वीस दिवसांपूर्वी वाघाचे कातडे घरामधे ठेवून त्याची देखभाल भुवड याने केली. मात्र, या घटनेची माहिती त्याने वन विभाग किंवा पोलिसांना दिली नाही. त्यामुळे वन विभागाने भुवड याला अधिक तपासासाठी ताब्यात घेतले आहे. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी दापोलीचे वनपाल एम. जांभळे, वनरक्षक ओ. व्ही. भागवत, अमित निमकर, अनिल दळवी, एम. जी. पाटील, तौफिक मुल्ला व अशोक ढाकणे उपस्थित होते. चिपळूणचे विभागीय वन अधिकारी विकास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे वनक्षेत्रपाल एस. जी. पाटील व चिपळूणचे वन क्षेत्रपाल जी. एन. कोले अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)