मंदावलेल्या बाजाराला बाप्पांमुळे चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:38 IST2021-09-10T04:38:27+5:302021-09-10T04:38:27+5:30
रत्नागिरी : कोरोनामुळे शासकीय आदेशाचे पालन करीत गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जात असला तरी हा कोकणातील सर्वात मोठा सण ...

मंदावलेल्या बाजाराला बाप्पांमुळे चालना
रत्नागिरी : कोरोनामुळे शासकीय आदेशाचे पालन करीत गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जात असला तरी हा कोकणातील सर्वात मोठा सण असल्याने भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली आहे. गुरुवारी पावसाने उघडीप दिल्याने गणपती घरी नेण्याबरोबरच खरेदीच्या कामातही कोणताही व्यत्यय आला नाही. कोरोनामुळे मंदावलेल्या बाजारपेठेला गणेशोत्सवाने थोडा तरी उत्साह दिला आहे. मिठाई, सजावट साहित्य, कपडे तसेच पूजा साहित्याची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
मखर सजावटीचे साहित्य, पडदे, झुंबर, विद्युत माळा, प्लास्टिकच्या फुलांच्या माळा खरेदीला विशेष मागणी होती. खूप दिवसांनी कापड दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी झाली होती. बाप्पांचा प्रसादासाठी विविध कंपन्यांनी निरनिराळ्या स्वादातील मोदक पॅकेट्स बाजारात विक्रीसाठी आणले आहेत. उकडीच्या मोदकांसाठी मात्र खास ऑर्डर घेण्यात येत होती. चिवडा, लाडू, पंचखाद्य, साखर फुटाणे, कडक बुंदी लाडू यांनाही विशेष मागणी होती.
ताज्या फुलांचा वापर सजावटीबरोबर पूजेसाठी केला जातो. त्यामुळे हार, सुटी फुले, गणपतीसाठी किरीट/मुकुट, बाजूबंद, कमरपट्टा याचबरोबर वेण्या/गजरे यांचाही खप वाढला आहे. याशिवाय दुर्वांच्या जुड्या, दुर्वा हार, झेंडू, शेवंतीची फुले बाजारात विक्रीला उपलब्ध होती. तयार मोदक पीठ, केळीची पाने, हळदीची पाने, विविध प्रकारच्या भाज्या, काकडी, चिबूड, नारळ याचीही खरेदी सुरू होती. हरतालिकेचे व्रत महिला करीत असल्याने फळे, शहाळ्यांना विशेष मागणी होती.
काही भाविकांकडे दीड दिवसांचे गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात येत असल्याने पहिल्याच दिवशी श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जात असल्याने पूजेचे साहित्य, प्रसादासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी सुरू होती. उत्सवानिमित्त बांगडीच्या दुकानातून महिला वर्गाची गर्दी झाली होती.
पावसाची उघडीप असल्याने भाविकांनी एक दिवस आधीच गणेशमूर्ती घरी नेल्या. डोक्यावर, हातगाडी, रिक्षा, टेम्पो, कार म्हणून बाप्पांचा प्रवास सुरू होता. मिरवणुकांना बंदी असल्याने ढोलताशांशिवाय केवळ बाप्पाचा जयघोष करीत गणेशमूर्ती घरी नेण्यात आल्या. शुक्रवारी श्रीगणेशाची स्थापना होत असल्याने गुरुवारी बस आणि रेल्वेमधून येणाऱ्यांची संख्या अधिक होती.