पायलागग्रस्त जनावरांना बंदी

By Admin | Updated: September 6, 2015 22:43 IST2015-09-06T22:43:48+5:302015-09-06T22:43:48+5:30

खेड तालुका : संसर्गजन्य आजार असल्याने गावांचा निर्णय

Bancaped animals | पायलागग्रस्त जनावरांना बंदी

पायलागग्रस्त जनावरांना बंदी

दिनकर चव्हाण - आंबवली -खेड तालुक्यातील पाळीव जनावरांना मोठ्या प्रमाणात पायलाग रोगाची लागण झाली आहे. या रोगाला आळा घालण्यासाठी प्रशासकीय यंत्रणाही तैनात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या अज्ञानामुळे या पायलागावर तातडीने प्राथमिक उपचार होत नसल्याने अनेक जनावरे दगावत आहेत. संसर्गजन्य आजार असल्याने पायलाग झालेल्या जनावरांना अन्य गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
काही गावांमध्ये गोठ्यात बांधून ठेवलेल्या जनावरांना बाहेर पडायला तसेच अन्य गावातही बंदी घालण्यात आल्याने जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रोगांची लागण होऊ नये याकरीता ही दक्षता घेण्यात येत आहे. या रोगांवर इलाज करणारा इथला दवाखाना मात्र औषधोपचारांनी सज्ज आहे. काही गावांना हे अंतर जास्त दूर झाल्याने जनावरे मरण्याची संख्या जास्त वाढली आहे. खेड शहराबरोबर आता तालुक्यातील ग्रामीण भागातदेखील या रोगाची लागण झाली आहे़ खेड तालुक्यात १५ दिवसांपूर्वी जनावरांना पायलागाची लागण झाली आहे. गोठ्यात बांधलेल्या तसेच चरायला गेलेल्या जनावरांच्या पायाच्या खुरक्यांना या रोगाची लागण होत आहे. सुरूवातीला खुरक्यांमध्ये ओली जखम होते़ या जखमेवर माशा तसेच विविध कीटक बसत असल्याने हा रोग बरा न होता अल्पावधीतच फैलावतो, हा रोग संसर्गजन्य आहे. यामुळे चरायला गेलेल्या जनावरांमुळे या रोगाची लागण अन्य जनावरांनाही होते़ खेड शहरात पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र, खुद्द शहरातील भटक्या जनावरांनाही हा पायलाग झाला असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यास कोणीही धजावत नाही. जनावरांमुळेच परिसरात हा रोग फैलावल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे़
पायलागाची लागण झालेली जनावरे लगतच्या जंगलात चरावयास जात असल्याने तेथील जनावरांनाही या रोगाची लागण होत आहे. लगतच्या गावातील ग्रामस्थांनीही पायलागाची लागण झालेल्या जनावरांना येण्यास बंदी घातली आहे. गावबंदी घातल्याने आता मोठा पेच निर्माण झाला आहे. याविषयी आता जिल्हा परिषदने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

पायलागग्रस्त जनावरांचा आजार इतर जनावरांनाही होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात ज्या ज्या गावांमध्ये ही साथ पसरली आहे, त्याठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम तैनात करणे गरजेचे बनले आहे. हा आजार गेले १५ दिवस जाणवत आहे. त्यामुळे त्याचा फैलाव भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.

Web Title: Bancaped animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.