बंदी उठूनही मासेमारी गाळात
By Admin | Updated: August 6, 2015 23:42 IST2015-08-06T23:42:51+5:302015-08-06T23:42:51+5:30
मच्छीमार संकटात : गाळाच्या समस्येसह वातावरणातील बदलांचा फटका

बंदी उठूनही मासेमारी गाळात
रत्नागिरी : किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने मच्छिमारांना सावधानतेचा इशारा मत्स्य विभागाकडून दिला होता. हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे मासेमारी नौका किनारी नांगरावर आहेत. आधीच गाळाच्या समस्येमुळे हैराण झालेल्या मच्छीमारांना आता वातावरणातील बदलाने आणखीनच संकटात टाकले आहे.
खोल समुद्रातील मासेमारीवरील बंदी उठून पाच दिवस उलटले आहेत. अजूनही समुद्र शांत झालेला नाही. सोसाट्याच्या वाऱ्यासह समुद्रामध्ये उंच लाटा उडत असल्याने मच्छिमारांना समुद्रात जाणे अजूनही धोकादायकच आहे. तरीही काही मच्छिमार जीव मुठीत धरुन खोल समुद्रात मासेमारीसाठी जात आहेत. जीव धोक्यात घालून मासेमारी करीत असले तरी मिळणाऱ्या कोळंबीला आवश्यक तो दर मिळत नसल्याचे मच्छिमारांमध्ये नाराजीचा सूर उमठत आहे. गेले काही दिवस शांत असलेल्या पावसाने जोर धरला आहे. जिल्ह्यात पावसाच्या सरींवर सरी कोसळत असून सोसाट्याचा वाराही वाहत आहे. तसेच लाटा उसळत आहेत. समुद्र किनारी भागांमध्ये कोकणात जोरदार वारे व पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. तसेच मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सावधानतेचा इशाराही दिला होता. या इशाऱ्यानंतर गेले दोन दिवस वातावरणामध्ये सतत बदल सुरु होते. त्यामुळे मच्छिमारही चिंतेते होते. या इशाऱ्यानंतर नौका दोन दिवस नांगरावर आहेत. (शहर वार्ताहर)
६ आॅगस्ट २०१५ रोजी रात्रौ ११.३० वाजेपर्यंत मालवण ते वसई किनारपट्टी दरम्यान २.५ ते २.९ मिटर उंचीच्या लाटा उठण्याची शक्यता आहे. पाण्याचा प्रवाह ६२ ते ६९ सें.मी. प्रती सेकंड राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय आणि रिलायन्स फाऊंडेशनने मच्छिमारांना देण्यात आला होता. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १८००-४१९-८८०० संपर्क साधण्याचे आवाहन मच्छिमारांना करण्यात आले आहे. मात्र, गुरुवारी सतत बदलत्या वातावरणामुळे मच्छिमार धोका पत्करण्यास तयार नाहीत.