जिल्ह्यात निकृष्ट कल्टार

By Admin | Updated: July 22, 2015 23:57 IST2015-07-22T22:19:23+5:302015-07-22T23:57:56+5:30

कृषी विभाग : २८ लाखांच्या दर्जाहीन कल्टारची विक्री !

Bad cultar in the district | जिल्ह्यात निकृष्ट कल्टार

जिल्ह्यात निकृष्ट कल्टार

रत्नागिरी : जिल्ह्यात आंबा पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुमारे २८ लाखांचे ५०० लीटर्सपेक्षा अधिक कल्टार विकले गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. कमी दर्जा असलेल्या या कल्टारच्या वापरामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. दरम्यान, जिल्हा कृषी विभागाने विक्रेत्यांकडे असलेल्या सिंजेटा कंपनीच्या नुकसानकारक कल्टार विक्रीवर बंदी घातली आहे, तर कमी दर्जाचे कल्टार विकताना कोणी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश शेवडे व कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी दिला आहे.
जिल्ह्यात आंबा हे मुख्य पीक आहे. जवळपास ६८ हजार हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे. आंब्याला लवकर मोहोर व आंबे येण्यासाठी शेतकरी विविध कंपन्यांची कल्टार (पीक संवर्धन संजीवके) वापरतात. त्यामध्ये काही कंपन्या या शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांना थेट विक्री करीत असल्याचे प्रकार जिल्ह्यात सुरु आहेत. या विके्रत्यांकडून शेतकऱ्यांना कल्टार खरेदीचे बिल दिले जात नाही. हे कल्टार अत्यंत कमी दर्जाचे असल्यामुळे कमी किमतीत शेतकऱ्यांना दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होणारच आहे. शिवाय बागेचे नुकसान होऊन उत्पन्नातही मोठी घट होणार आहे. हापूस आंब्याच्या कलमांवरही त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी हे कल्टार खासगी विक्रेत्यांकडून न घेता अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदी करावे. तसेच संबंधित विक्रेत्यांकडून पक्क्या बिलाची मागणी शेतकऱ्यांनी करावी. दिलेले बिलही जपून ठेवावे, जेणेकरुन भविष्यात काही तक्रार आल्यास संबंधित विक्रेत्याविरुध्द कृषी विभागाला कारवाई करणे सोयीस्कर होईल, असेही उपाध्यक्ष शेवडे यांनी सांगितले.
सध्या बाजारामध्ये कलस्टार, बोलस्टार आणि सेलस्टार अशा विविध नावांनी ही कल्टार उपलब्ध आहेत. ही कमी दर्जाची कल्टार कोणी अनधिकृतरित्या विकत असतील अथवा अशा अनधिकृत विक्रेत्यांबद्दल शेतकऱ्यांना काही माहिती मिळाल्यास तसेच त्याबाबत काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी (दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२३०६८) यांच्याशी संपर्क साधावा व भविष्यात होणारे आपले मोठे नुकसान टाळावे, असे आवाहन उपाध्यक्ष शेवडे यांनी केले आहे. (शहर वार्ताहर)


कमी दर्जाच्या आणि भविष्यात आंबा बागांना नुकसानकारक ठरणाऱ्या एका कंपनीच्या कल्टारची विक्री करताना रत्नागिरी शहरातील काही विके्रते आढळून आले. या विक्रेत्यांकडे असलेल्या या कंपनीच्या ५३० लीटर्सच्या कल्टार विक्रीवर तत्काळ बंदी घालण्यात आली.
- पी. एन. देशमुख
कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.


आंबा बागायतदारांंनी कल्टारची खरेदी अधिकृत विक्रेत्यांकडूनच करावी. खरेदीचे बिल घेऊन ते जपून ठेवण्याची कृषी विभागाची सूचना.

निकृष्ट दर्जाचे कल्टार विक्रेत्यांबाबत तक्रार आल्यास जिल्हा परिषद कृषी विभागाकडून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा.

गावोगाव विनाबिल निकृष्ट कल्टार विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे प्रमाण वाढल्याने हापूस आंबा पीक धोक्यात येणार असल्याची शक्यता.

Web Title: Bad cultar in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.