बाबासाहेबांचे स्मारक होणार तीन मजली
By Admin | Updated: December 10, 2015 00:49 IST2015-12-10T00:42:43+5:302015-12-10T00:49:41+5:30
अमर साबळे : आंबडवे गाव येणार जगाच्या नकाशावर

बाबासाहेबांचे स्मारक होणार तीन मजली
मंडणगड : केंद्र शासनाच्या संसद आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळगाव आंबडवे जगाच्या नकाशावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे खासदार अमर साबळे यांनी सांगितले. याठिकाणी होणारे बाबासाहेबांचे स्मारक तीन मजली उभाणार असल्याचे ते म्हणाले.
आंबडवे येथे आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेला साबळे उपस्थित होते. यावेळी आंबडवे येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना आदर्श ग्राम योजनेचा प्रशासनाने तयार केलेला ११० कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा विषद केला. आंबडवे येथे अस्तित्त्वात असलेल्या बाबासाहेबांच्या स्मारकाचे नूतनीकरण सुरू आहे. या जागेत तीन मजली इमारत उभी राहणार असून, इमारतीत अस्थीकलश, पुतळा व ग्रंथालयाचा समावेश होणार आहे. या स्मारकाच्या बाजूला बाबासाहेबांच्या सामाजिक कार्याचे टप्पे विषद करणारी शिल्पसृष्टी उभारण्यात येणार आहे.
याशिवाय शिगवण ग्रामपंचायत हद्दीतील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा ई - लर्निंग स्कूलमध्ये रुपांतरीत करून सोलर सिस्टिम लावलेली आधुनिक व विजेच्या वापरात स्वयंपूर्ण असेलेल्या घराची निर्मिती करण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी अद्ययावत निवास व्यवस्थेसह ओबे व्हॅनच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस चौकी, मोफत वायफाय सेवा, डिजिटलाईज्ड शासकीय सेवेच्या निर्मितीला प्राधान्य राहणार आहे़.
शासनाच्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामास लागली असून, गावाच्या विकासाला निधी कमी पडून न देण्याचे आश्वासन केंद्र व राज्य शासनाने दिले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, आमदार संजय कदम, जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, प्रांताधिकारी जयराम देशपांडे, श्रीकृष्ण फड, निवासी नायब तहसीलदार अनिल कांबळे, विकास गारुडकर, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, सहायक गटविकास अधिकारी अरुण जाधव, सरंपच सुचिता फराटे, पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर, नगराध्यक्षा श्रुती साळवी, माधव गवळी, संजय यादवराव, रमेश दळवी, सचिन थोरे, सिध्दार्थ कासारे, सुभाष सापटे, मुंझीर दाभीळकर, सुदर्शन सकपाळ, सुदाम सकपाळ, डॉ. प्रभाकर भावठकर, उपअभियंता कलाकर पाथाडे, उपअभियंता विष्णू पवार, अभियंता सकपाळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आराखडा वाढणार ?
मंडणगड तालुका विकासाच्या मूळ प्रवाहात आणणारा हा आराखडा दिडशे कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यात बाणकोट-पंढरपूर राज्य मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम प्रस्तावित आहे. त्यामुळे मंडणगड ते आंबडवे हे अठरा किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ कमी होऊन पर्यटकांची मोठी सोय होणार आहे.