प्रश्नावर पडणार अक्षता
By Admin | Updated: August 24, 2014 00:38 IST2014-08-24T00:38:26+5:302014-08-24T00:38:26+5:30
राष्ट्रीय महामार्ग : चौपदरीकरणाचे आज भूमीपूजन

प्रश्नावर पडणार अक्षता
रत्नागिरी : गेली अनेक वर्षे रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचा श्रीगणेशा उद्या रविवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सायंकाळी ४ वाजता वांद्री सप्तलिंगी (ता. संगमेश्वर) पुलाच्या भूमीपूजन कार्यक्रमाने होणार आहे. महामार्ग चौपदीकरणाचा हा प्रश्न गेली अनेक वर्षे रखडला होता.
महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी अतिरिक्त भूसंपादन करणे आवश्यक असल्याने प्रथम या महामार्गावरील पुलांचे विस्तारीकरण होणार आहे. या कामात भूसंपादनाची अडचण होणार नसल्याने विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा व्यक्त होत आहे. या महामार्गावर १४ पूल असून त्याचबरोबर दोन रेल्वे पुलांचा समावेश आहे.
या चौपदरीकरणासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा बाजारपेठ तसेच राजापूरची लोकवस्ती अडचणीत येण्याची भीती असल्याने तेथून या विस्तारीकरणाला विरोध होत आहे. रविवारी वांद्री सप्तलिंगी पुलाच्या कामाचे भूमीपूजन झाल्यानंतर पूल विस्तारीकरणाचे काम सुरू होईल.
इंदापूर ते झाराप असा ३६६ किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव असून यासाठी १८० कोटी६९ लाख रूपयांचे १२ पूल आणि २ रेल्वे उद्दाणपूल होणार आहेत. अरूंद पूल असलेल्या ठिकाणी नव्याने रूंद पूल बांधण्यात येणार आहेत.
या राष्ट्रीय महामार्गावर वाशिष्ठी, सप्तलिंगी, जगबुडी, कोळंबे, आंजणारी, वाकेड, राजापूर, खारेपाटण, जानवली, कसाल, बांबर्डे यासह एकूण १२ पूल व खेड आणि चिपळूण येथे दोन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. महामार्ग भूसंपादनाला मोठा कालावधी लागणार असल्याने चौपदरीकरणाचे काम विलंबाने होण्याची शक्यता आहे. मात्र, चौपदरीकरणाबरोबर पुलाचाही प्रश्न गंभीर असल्याने पूल विस्तारीकरण झाल्यास महामार्गावरील अपघाताचे प्रमाण काहीअंशी कमी होणार आहे.
पुलांची कामे जलद गतीने होणार असून त्यासाठी प्रातिनिधक स्वरूपात पुलाच्या ठिकाणी उद्या रविवार, दि. २४ रोजी सायंकाळी ४ वाजता भूमिपूजन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
गडकरींची उपस्थिती..
महामार्गावरील पुलांचे विस्तारीकरण प्राधान्याने होणार.
महामार्गावर १४ पूल, दोन रेल्वे पुलांचाही समावेश.
वांद्री सप्तलिंगी पुलाच्या कामाचे भूमीपूजन झाल्यानंतर पूल विस्तारीकरणाचे काम होणार सुरू.
इंदापूर ते झाराप असा ३६६ किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव.
शक्तीप्रदर्शनाची शक्यता
चौपदरीकरणाचा प्रश्न अनेक वर्षे रेंगाळत असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या वाढत्या प्रमाणाने महामार्ग धोकादायक बनला होता. चौपदरीकरणाचा प्रश्न हाताळताना भाजपतर्फे रविवारी शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. यावेळी अवजड वाहतूक मंत्री अनंत गीते, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खासदार विनायक राऊत हेही उपस्थित रहाणार आहेत.