देवरुख पुरवठा विभागाचा अजब कारभार
By Admin | Updated: January 19, 2015 00:23 IST2015-01-18T23:15:53+5:302015-01-19T00:23:35+5:30
चौकशीची मागणी : एकाच दुकानावर अन्य गावांचा भार टाकल्याने ग्राहक नाराज

देवरुख पुरवठा विभागाचा अजब कारभार
एजाज पटेल - फुणगूस -देवरुख तालुका पुरवठा विभागाच्या कारभाराची चर्चा सुरु असून, फुणगूस येथील रेशन दुकान चालकाकडे पोचरी येथील स्वतंत्र रेशन दुकानाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे. यामुळे एक व्यक्ती दोन दुकानाचा ‘वहाडी’ केल्याने, दुकान चालकाला महिन्यातून अनेकदा फुणगूस येथील दुकानाला कुलूप ठोकूनच, पोचरी येथील रेशन दुकान सांभाळावे लागत आहे. त्यामुळे फुणगूस येथील शिधापत्रीकाधारकांना धान्य उपलब्ध असूनही, वेळेवर धान्य न मिळता हेलपाटे मारावे लागत आहेत. या कारभारामुळे येथील लोकांसाठी येथील रास्त दराचे धान्य दुकान म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी अवस्था आहे.फुणगूस तसेच कोंड्ये या दोन गावांसाठी संयुक्त असलेल्या येथील रेशन दुकानदाराला या दोन गावामधील सुमारे १५०० शिधापत्रिका धारक जोडलेले आहेत. गेले ४० ते ४५ वर्षे कृ ष्णा मेणे हे दुकान चालक असून, शासनाच्या पुरवठा विभागाकडून आलेले धान्य ग्राहकांना देण्याचे कार्य करीत असताना, देवरुख पुरवठा विभागाने या चालकाकडे पोचरी येथील स्वतंत्र रेशन दुकानाचा ताबा दिल्याने महिन्यातून अनेकवेळा फुणगूस येथील दुकानाला कुलूप ठोकून पोचरी येथील शिधापत्रिकाधारकांची सेवा करावी लागत आहे. त्यामुळे फुणगूस येथील शिधापत्रीकाधारकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
एकीकडे शासन स्तरावरुन अनियमित, तसेच अपुऱ्या येणाऱ्या धान्याची बोंबाबोंब सुरु असताना, दुसरीकडे आलेले धान्यही अशा गोंधळी कारभारामुळे वेळेवर मिळत नसल्याने शिधापत्रिकाधारक त्रस्त झाले असून, याबाबत तहसीलदार वैशाली माने यांच्याकडे काही लोकांनी कैफीयत मांडली आहे. मात्र त्यांच्याकडून ऐकण्यापलीकडे कोणतीच कारवई न झाल्याने ‘भिक नको पण कुत्रा आवर’ असं म्हणण्याची वेळ शिधापत्रिकाधारकांवर आलेली आहे. हा त्रास केव्हा संपणार अशी स्थिती झाली आहे. सर्वत्र या प्रकाराच्या चौकशीची मागणी होत आहे.