अमली पदार्थविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST2021-06-29T04:22:01+5:302021-06-29T04:22:01+5:30
रत्नागिरी : अमली पदार्थविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांनी जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबवली आहे. यावर्षी ‘युवा पिढी आणि अमली पदार्थ’ ...

अमली पदार्थविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती मोहीम
रत्नागिरी : अमली पदार्थविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांनी जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबवली आहे. यावर्षी ‘युवा पिढी आणि अमली पदार्थ’ असे शीर्षक देण्यात आले होते. या जनजागृती माेहिमेंतर्गत रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरीतील सर्व नागरिकांना अमली पदार्थ दिवसाचे महत्त्व आणि मादक द्रव्यापासून होणारी हानी व घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. अमली पदार्थांविषयी कोणाला काही माहिती मिळाली तर त्यांनी ती पोलिसांना द्यावी. ही माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
महिला सुरक्षा कक्षाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक रेखा जाधव यांनी शहरातील अभ्यंकर-कुलकर्णी महाविद्यालयाच्या ६५ विद्यार्थ्यांना ऑनलाईन कार्यशाळेव्दारे मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक सुरेश गावीत यांनी खारवीवाडा - पावस येथील तरूणांना व रिक्षाचालकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामाविषयीची माहिती दिली. पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी अलसुरे व कोंडिवली गावातील लोकांना मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी डेरवण फाटा येथील नागरिकांना मार्गदर्शन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी भालवली - राजापूर येथील तरूणांना मार्गदर्शन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी शिरगाव नाका येथे रिक्षाचालक व नागरिकांना मार्गदर्शन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांनी देवरूख बाजारपेठ येथील नागरिकांना पत्रके वाटून मार्गदर्शन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी जयगड बाजारपेठ व बसस्थानक परिसरात जनजागृती केली.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे दि. १५ जून ते ३० जून या कालावधीत अमली पदार्थविरोधात मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यासाठी रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण, पूर्णगड, जयगड, सावर्डे या सर्व पोलीस स्थानकांच्या हद्दीमध्ये फलक लावण्यात आले आहेत.
----------------------------
रत्नागिरी शहरातील जेल रोड नाका येथे पाेलिसांतर्फे अमली पदार्थविषयी जनजागृती बॅनर लावण्यात आले. (छाया : तन्मय दाते)