भाज्यांची उपलब्धता, दरातील चढ-उतार कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST2021-08-23T04:33:43+5:302021-08-23T04:33:43+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गावठी फळभाज्याही विक्रीसाठी येऊ लागल्या ...

भाज्यांची उपलब्धता, दरातील चढ-उतार कायम
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गावठी फळभाज्याही विक्रीसाठी येऊ लागल्या असून श्रावणामुळे भाज्यांना वाढती मागणी आहे. मात्र, दरात चढ-उतार कायम असून ग्राहकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
श्रावणामुळे बहुतांश लोक शाकाहार अवलंब असल्याने भाज्यांना वाढती मागणी आहे. पालेभाज्यांसह दुधी, दोडके, पडवळ, भोपळा आदी फळभाज्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. फळांमध्ये सध्या सीताफळ मोठ्या प्रमाणात येत आहेत. उपवासामुळे फळांना वाढती मागणी आहे.
भेंडी, कारली, घेवडा, फरसबी, सिमला मिरची, कोबी, फ्लाॅवर, मटार बाजारात विक्रीसाठी येत असून बहुतांश भाज्या १५ ते २० रुपये पाव किलो दराने विकण्यात येत आहेत. अळूची पाने, याशिवाय रानभाज्यांची उपलब्धता होत आहे. अळूच्या पानासह हळदीच्या पानाचीही मागणी होत आहे. मेथी, माठ, मुळा, पालक, शेपू या पालेभाज्यांची जुडी १० ते १५ रुपये दराने विकण्यात येत आहे. याशिवाय काकडी, चिबूडही बाजारात विक्रीसाठी येऊ लागले आहेत.
कांदे, बटाटे दर स्थिर
श्रावणात बहुतांश लोक कांदा वर्ज्य करतात. कांद्याची मागणी काहीअंशी घटली असली तरी बटाट्याला मात्र वाढती मागणी आहे. कांदा २५ ते ३०, तर बटाटा २० ते २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. कांदा-बटाट्याचे दर मात्र सध्या तरी स्थिर आहेत. श्रावणानंतर दरामध्ये पुन्हा फरक पडण्याची शक्यता आहे.
सीताफळांचा हंगाम सुरू असून बाजारात सीताफळे मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ८० ते १२० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. शिवाय ओला खजूर, पपई, नासपती, अंजीर, केळी, पेरू, मोसंबी, संत्री उपलब्ध असून मागणीही वाढती आहे.
उपवासामुळे ओल्या भुईमुगाच्या शेंगा, मक्याची कणसे, रताळी यांना वाढती मागणी आहे. शेंगा ७० ते ८० रुपये किलो तर रताळी ४० ते ५० रुपये किलो तर मका दहा रुपयांना एक नग दराने विक्री सुरू आहे.
वास्तविक बारमाही भाज्यांना वाढती मागणी आहे. जिल्ह्यात बहुतांश भाजीपाला विक्रीसाठी अन्य जिल्ह्यातून येत असला तरी दरावर मात्र निर्बंध नसल्यामुळे सर्वसामान्यांची फरपट होत आहे. भाजीपाला असो वा डाळी, कडधान्य सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. एकाच शहरात भिन्न दर आकारण्यात येत असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
- अस्मिता पागधे, गृहिणी
परजिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक झाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लिलाव झालेनंतरच विक्रीसाठी शहरात व आसपासच्या गावात वितरित होते. प्रत्यक्ष लिलावाचे दर व विक्रीच्या दरात कमालीची तफावत आढळत असून दरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेने तरी याबाबत लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून ग्राहकांची फरपट थांबेल.
- मंजिरी सांगले, गृहिणी