कोकण ‘ब्युटी’चे निर्मात्यांना आकर्षण
By Admin | Updated: March 28, 2015 00:08 IST2015-03-27T22:10:02+5:302015-03-28T00:08:01+5:30
अरूण नलावडे : नाट्य परिषद रत्नागिरी शाखेला भेट

कोकण ‘ब्युटी’चे निर्मात्यांना आकर्षण
रत्नागिरी : कोकणात ‘ब्युटी’ दडलेली आहे, तिचे आकर्षण बाहेरच्या सिनेनिर्मात्यांना वाटू लागले आहे. येथील चित्रिकरणाचा ओघ वाढला आहे. त्यामुळे यात स्थानिकांना प्राधान्य मिळावे, यासाठी येथील अखिल भारतीय नाट्य परिषदेने प्रयत्न करावेत, असे मत ज्येष्ठ अभिनेते अरूण नलावडे यांनी परिषदेच्या कार्यालयाला भेट दिली असता व्यक्त केले.
रत्नागिरीत एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी अरूण नलावडे गुरुवारी रत्नागिरीत आले होते. त्यांनी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सावरकर नाट्यगृहातील कार्यालयाला सायंकाळी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत चित्रपट महामंडळाचे सदस्य आणि मराठीसह भोजपुरी चित्रपटाचे निर्माते दिलीप दळवी हेही होते. नलावडे म्हणाले, मी आता जो चित्रपट करतोय, तो शाळेशी संबंधित असल्याने येथील शाळेतील मुलांचा त्यात समावेश आहे. इथल्या मुलांमध्ये अभिनय गुणवत्ता आहे. त्यामुळे परिषदेने त्यांचे पुढे आणण्यासाठी, अभिनयात त्यांना सक्षम करण्यासाठी अभ्यासवर्ग घ्यावा, असेही त्यांनी सुचविले. कोकणात बाहेरची संस्कृती दाखवण्यापेक्षा आपली इथली संस्कृती दाखवणे गरजेचे आहे आणि ती चांगल्या पद्धतीनेच दाखवली पाहिजे. यासाठी त्यात स्थानिक कलाकारांना प्राधान्य मिळावे, यासाठी नाट्य परिषदेने प्रयत्न करावेत, अशी आग्रही भूमिका नलावडे यांनी याप्रसंगी मांडली. कोकणातील निसर्ग व तेथील माणसे यांचे आकर्षण बाहेरील चित्रपट निर्मात्यांना राहिले आहे. दिवसेंदिवस ते वाढतच जाणार आहे.
कोकणची स्तुती करताना ते म्हणाले की, येथील सिनेमे आता वाढू लागले आहेत. त्याचे कारण हे आहे की, येथील निसर्गसौंदर्य कुणालाही खिळवून ठेवणारे असेच आहे. इतर ठिकाणी जेवणाचीही वानवा जाणवते. मात्र, कोकणात माणसांची आणि त्यांच्या सहकार्याची भ्रांत नाही, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
बदललेली जीवनशैली आणि पटकन मिळणारी प्रसिद्धी यासाठी नवीन कलाकार धावत असल्याचे यावेळी नलावडे यांनी सांगितले. त्याचबरोबर आता विविध वाहिन्यांचे मालिकागणिक चेहरे बदलण्याचे धोरण असल्याने नव्या कलाकारांना वाटेल तितका वेळ कामासाठी द्यावा लागतो. दुसरे काम मिळेल ना, ही असुरक्षितता असल्यानेच आता वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना निर्माता सांगेल, तितका वेळ नाईलाजाने द्यावा लागतो, असे मतही नलावडे यांनी व्यक्त केले.
यावेळी दिलीप दळवी यांनी रत्नागिरीतच सुमारे १८० स्थळांवर चित्रिकरण होऊ शकते, असे सांगतानाच आपल्या मेलवर १०५ स्थळांची यादी आल्याची माहिती दिली. प्रस्तावना अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या येथील शाखेचे कार्याध्यक्ष सुनील तथा दादा वणजु यांनी केली. यावेळी कोषाध्यक्ष अनिल दांडेकर, आप्पा रणभिसे, राजकिरण दळी, चिटणीस आसावरी शेट्ये, जयश्री बापट, अभिनेते प्रफुल्ल घाग, अनुप पेंडसे, सुनील बेंडखळे, सुहास साळवी आदी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)