पोलिसांच्या प्रभातफेरीने वेधले साऱ्यांचे लक्ष
By Admin | Updated: November 24, 2015 00:26 IST2015-11-23T23:21:18+5:302015-11-24T00:26:50+5:30
चिपळूण तालुका : पोलीस मित्रांसह ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचा समावेश; दारूबाधित गावात जनजागृती

पोलिसांच्या प्रभातफेरीने वेधले साऱ्यांचे लक्ष
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे पोलीस ठाण्यातील कर्मचारी व पोलीस मित्र यांची रविवारी सावर्डे पोलीस ठाण्यापासून प्रभात फेरी काढण्यात आली. ही प्रभात फेरी सावर्डे तसेच दारुबाधित गाव निवळी कोस्टेवाडी या ठिकाणी पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी गावागावातून पोलीस मित्रांची निवड करून त्यांना ओळखपत्र देण्यात
आले. ‘पोलीस हे जनतेचे डोळे व कान आहेत’ असे वेगवेगळे फलक घेऊन ग्रामस्थ, विद्यार्थी आणि पोलीस मित्र प्रभात फेरीत सहभागी झाले होते. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलीस ठाणे स्तरावर गावातील महिला पोलीस मित्रांचा समावेश करण्यात आला आहे. कॉलेजमधील युवतींची छेडछाड, विनयभंग होणे, हुंड्यासाठी नवविवाहितांचा होणारा छळ व छळाला कंटाळून होणाऱ्या आत्महत्या या सर्व बाबींचा विचार करून गावातील महिला पोलीस मित्रांची निवड केली आहे.
सागरी सुरक्षेमध्ये सागर किनाऱ्यावरील गावांत अनोळखी अगर संशयीत व्यक्तींच्या वास्तव्याबाबत लक्ष ठेवून उपयुक्त माहिती पोलिसांना तत्काळ कळविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सोशल मीडियाच्या विविध माध्यमांद्वारे प्रक्षेपित होणाऱ्या संदेशामधून समाजामध्ये विविध प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. यामुळे कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी पोलीस मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे.
वाहतूक नियम व प्रबोधन महामार्गावरील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहनचालकांना वाहने व्यवस्थित पार्क करण्याचे आवाहन करण्यासाठी, आठवडा बाजाराच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस मित्रांच्या सहाय्याने नियंत्रणात आणण्यासाठी मदत होऊ शकते.
तसेच हिंदू - मुस्लिम संमिश्र वस्ती याठिकाणी रोज घडणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवून पोलीस मित्रांनी त्याबाबत माहिती देणे गरजेचे आहे. एस. टी. गाडीमध्ये चालक - वाहकांना गाडीमध्ये बेवारस वस्तू आढळल्यास त्याची माहिती तत्काळ देणे गरजेचे आहे.
रिक्षा चालक - मालक, आराम बस चालक - मालक यांना पोलीस मित्र म्हणून सहभागी करण्यात आले आहे. वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन केल्यास वाहतूक कोंडी व रस्ते अपघात होणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. (वार्ताहर)
कोणत्याही गुन्ह्याच्या तत्कालिक तक्रारीसाठी रत्नागिरी पोलीस ठाण्याचा व्हॉट्सअॅप नंबरही देण्यात आला आहे. अन्याय करणाऱ्यापेक्षाही अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार आहे. खात्याची माहिती कुणालाही देऊ नका, अफवांना बळी पडू नका, पोलीस हे जनतेचे सर्वोत्तम मित्र आहेत.
- सचिन इंगोले,
पोलीस निरीक्षक, सावर्डे
महिला पोलीस मित्रांचा समावेश.
पोलीस मित्रांना ओळखपत्रांचे वाटप.