देवधेत वाघाटे कुटुंबियांवर हल्ल्याचा प्रयत्न
By Admin | Updated: October 1, 2015 00:41 IST2015-09-30T23:53:30+5:302015-10-01T00:41:32+5:30
दहशत सुरुच : पोलीस अन् ग्रामस्थांच्या जागत्या पहाऱ्याला अपयश

देवधेत वाघाटे कुटुंबियांवर हल्ल्याचा प्रयत्न
लांजा : कुवे, लांजा येथे अज्ञात टोळक्याने दहशत घातल्यानंतर मंगळवारी रात्री या अज्ञातानी देवधे मालवाडी येथे राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर वाघाटे यांच्या घरात घुसून त्यांच्या मुलीवर हल्ला केल्याने ती किरकोळ जखमी झाली आहे. यामध्ये त्यांच्या पत्नीला जोरदार धक्का दिल्याने त्याही जखमी झाल्या आहेत. मध्यरात्री २ वा. घडलेल्या या घटनेमुळे देवधे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी रात्रौ ८ चे दरम्यान देवधे मालवाडी येथील चंद्रकांत खेडेकर यांच्या घरासमोर तीन अज्ञात व्यक्ती असल्याचे त्यांच्या पत्नी धनश्री व नंदिनी यांनी पाहिली. त्यानंतर त्यांच्या घराच्या दिशेने रेवा फेकण्याचा प्रक़ार घडल्याने त्यांनी आरडाओरड करुन साऱ्यांना जमा केले. मात्र, गेले दोन दिवस या परिसरातील विद्युत प्रवाह खंडीत झालेला होता. या परिसरात शोध घेण्यात आला. परंतु, हे अज्ञात घराच्या मागील जंगलमय भागात लपून बसले. या अज्ञातांची देवधे परिसरात वार्ता पसरल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या अंगणात जमा होऊन पहारा देऊ लागला. रात्रौ १० चे दरम्यान हेच अज्ञात लोक चंद्रकांत खेडेकर यांच्या घराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या जंगलमय परिसरातून पुन्हा त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला आले. मात्र, सर्व लोक अंगणात बसलेले पाहताच त्यांनी तिथून धूम ठोकली.
परिसरात अज्ञात व्यक्ती आल्याने देवधे खालची सावंतवाडी, मालवाडी, मधलीवाडी या परिसरातील लोक जागता पहारा ठेऊन होते. मालवाडीतून पळ काढल्यानंतर ते त्याच परिसरात झाडावर बसून असल्याचे निदर्शनास आले. ११ वा. च्या दरम्यान सुधाकर वाघाटे यांचे सर्व कुटुंब आपल्या अंगणामध्ये बसून होते. त्यावेळी घरासमोर असलेल्या आंबा कलमाच्या झाडावर कोणीतरी बसून असल्याचे त्यांच्या पत्नी जयमाला यांना दिसून आले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर उड्या मारत तो अज्ञात या ठिकाणाहून पळून गेला. त्यानंतर शेजारील एक मुलगा व सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर वाघाटे, त्यांच्या पत्नी, मुलगा, दोन मुली अशा अंगणात बसून होते.
मध्यरात्री दोनच्या दरम्यान घराच्या पडवीच्या बाहेरील बाजूला कॅन ठेवण्यात आला होता. त्याचा आवाज आल्याने जयमाला या घरात बॅटरी आणण्यासाठी गेल्या. या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या मागच्या बाजूने जाऊन पुन्हा अंगणामध्ये उभा असलेला मुलगा हेमंत याला धक्का दिला. यानंतर जयमाला बॅटरी घेऊन दरवाजात येताच त्यांना या अज्ञाताने डाव्या पायावर जोरदार धक्का दिला आणि सरळ घरामध्ये घुसला. अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने वाघाटे कुटुंब घाबरुन गेले. या अज्ञाताने घरामध्ये झोपलेल्या निलीमा सुधाकर वाघाटे (२४) हिच्यावर हल्ला केला. तिच्या उजव्या हातावर ओरखडे काढले आणि तिची मान पकडली. त्यावेळी तिने आरडाओरड सुरु केला.
याच दरम्यान पाळीव कुत्र्यांनी या अज्ञातावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने त्याने निलीमा हिला सोडून दिले व खिडकीचा आधार घेत आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. निलीमा घराच्या बाहेर आली. तिच्या बहिणीने धाडस करुन मुख्य दरवाजा बंद केला आणि त्या व्यक्तीला घरात कोंडून ठेवले. त्यामुळे अज्ञाताने पडवीची कौले काढून काजूच्या झाडावरुन पोबारा केला. या अज्ञाताने कधी पलायन केले हे लोकांनाही समजले नाही. लांजा पोलिसांना घटनेची कल्पना देण्यात आली. तळवडे रस्त्यावर गस्तीला असणारे पोलीस पथक आसगे येथून देवधे येथे दाखल झाले. पोलीस आल्यानंतर घराचा दरवाजा उघडण्यात आला. मात्र, घरामध्ये तो अज्ञात व्यक्ती आढळून आला नाही. या ठिकाणी लांजा पोलीस पहाटे ५ वाजेपर्यंत थांबून होते. (प्रतिनिधी)
भरदिवसा भरवस्तीत तळ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या लांजा नाईकवाडी येथील एका महिलेला दोन अज्ञातानी पकडून तिच्यावर हल्ला चढवला. यामध्ये या महिलेचे कपडे फाटले. तिने आरडाओरडा केल्यानंतर या अज्ञाताने जवळच असणाऱ्या पऱ्याच्या उंच गवतामधून पोबारा केला. दरम्यान त्यांच्याजवळ असणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या शाली काही अंतरावरच आढळून आल्या आहेत.