नेवरेत बँक फोडण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: October 12, 2014 00:51 IST2014-10-12T00:51:24+5:302014-10-12T00:51:40+5:30

रक्कम सुरक्षित : एटीएमचा दरवाजा फोडून कुलूप तोडले

Attempt to break the bank in Nevada | नेवरेत बँक फोडण्याचा प्रयत्न

नेवरेत बँक फोडण्याचा प्रयत्न

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेमध्ये मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला; मात्र तो यशस्वी झाला नाही.
कटावणीच्या साहाय्याने बँकेच्या दर्शनी बाजूच्या उजव्या खिडकीच्या वरील लोखंडी ग्रील्स उचकटून त्याआतील स्लायडिंगची खिडकी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. काल, शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता ही चोरी झाली असावी, असे सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून दिसून येत आहे. बँकेची महत्त्वाची तिजोरी असणाऱ्या लॉकर रुमच्या लाकडी दरवाजावरील कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी मुख्य लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला यश आले नाही. चोरट्याचे या लॉकरजवळील लोखंडी दरवाजावरील हाताच्या बोटांचे ठसे तज्ज्ञांनी घेतले आहेत. ही बँक नेवरे बाजारपेठेतील मुख्य मार्गावर असतानासुद्धा व आजूबाजूला वस्ती असतानाही या बँकेला चोरट्यांनी लक्ष्य केल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बँकेमधील चोरी करण्याचा बेत फसल्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा बँकेला लागूनच असलेल्या एटीएमकडे वळविला व एटीएमचा मुख्य दरवाजा उचकटून आतील कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला; मात्र तो देखील यशस्वी झालेला नाही. या घटनेची पाहणी आज, शनिवारी सकाळी बँक उघडण्याच्या सुमारास बँकेच्या शाखाधिकारी रोहिणी हर्षे यांनी केली असता त्यांना चोरी झाली असल्याचा प्रकार दिसून आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ याविषयीची खबर रत्नागिरीच्या ग्रामीण पोलीस यंत्रणेला दिली. यावेळी ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भांड्ये व भगवान पाटील यांनी आपले सहकारी पो. कॉन्स्टेबल प्रवीण झुनगुरे, पोलीस नाईक संतोष शिंदे यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी रत्नागिरी पोलिसांच्या श्वान पथकालाही बोलविण्यात आले. या पथकातील ‘सम्राट’ या श्वानाला घेऊन पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास पवार, प्रशांत बोरकर, राजू सावंत व चालक दशवंत राव, आदी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, येथील बँकेच्या व एटीएमच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी सुरक्षा रक्षक दिवस-रात्र न ठेवल्यामुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. याअगोदर काही महिन्यांपूर्वी जाकादेवी येथील बँक दरोडा प्रकरण ताजे असतानाही या बँकेकडे सुरक्षिततेविषयी कोणतीही काळजी घेण्यात आली नसल्याने परिसरातील ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)

Web Title: Attempt to break the bank in Nevada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.