मनोरुग्ण महिलेवर अत्याचार
By Admin | Updated: January 7, 2015 00:04 IST2015-01-06T23:50:35+5:302015-01-07T00:04:11+5:30
संशयितास अटक : शिवार आंबेरे येथील घटना

मनोरुग्ण महिलेवर अत्याचार
रत्नागिरी : मनोरुग्ण महिलेच्या असाहाय्यतेचा फायदा घेत एका संशयिताने तिच्याशी अतिप्रसंग केला. शिवार आंबेरे येथील जाखमाता मंदिरात काल, सोमवारी रात्री ८.१५ वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आज, मंगळवारी सायंकाळी ४.१० वाजता संशयित आरोपी गोपाळ गणेश आडवीरकर (वय ५०, खारवीवाडा, शिवार आंबेरे) याला अटक करण्यात आली.
पीडित महिला ही मनोरुग्ण असून सुमारे ५० वर्षे वयाची आहे. ती गेल्या दोन वर्षांपासून शिवार आंबेरे येथे राहते. दिवसा गावभर फिरून कोण काही देईल ते अन्न खाऊन सायंकाळनंतर गावातील जाखमाता मंदिरात झोपण्यासाठी येत असे. सोमवारी सायंकाळी ती सात वाजता जाखमाता मंदिरात आली. त्यानंतर ८.१५ वाजता मंदिरात आलेल्या गोपाळ आडवीरकर याने तिच्याशी अतिप्रसंग केला.
हा प्रकार पाहिलेल्या गजानन शंकर लाखण (४०) यांनी याबाबत आडवीरकर याच्याविरोधात पूर्णगड पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी भारतीय दंडविधान ३७६ अन्वये गुन्हा दाखल करून आज संशयित आरोपीस अटक केली. त्याला सायंकाळी न्यायालयात हजर केले असता १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाळा कुंभार अधिक तपास करीत आहेत.