अरुणाचा जीवनप्रवास उलगडला
By Admin | Updated: June 22, 2015 00:24 IST2015-06-21T22:28:56+5:302015-06-22T00:24:58+5:30
वैशाली गावडे : कुडाळात बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे आदरांजली

अरुणाचा जीवनप्रवास उलगडला
कुडाळ : येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्यावतीने केईएम रुग्णालयामधील डॉग सर्जरी शाखेच्या प्रमुख अरुणा शानबाग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला केईएम रुग्णालयाच्या माजी अधिपरिचारिका आणि अरुणा शानबाग यांच्या सहपरिचारिका तसेच बॅ. नाथ पै स्कूल आॅफ नर्सिंगच्या प्राचार्या वैशाली गावडे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी त्यांनी १९६६ ते २०१५ पर्यंतचा अरुणा शानबाग यांचा वेदनामय जीवनप्रवास उलगडला. प्राचार्या गावडे म्हणाल्या, कार्यतत्पर, शिस्तप्रिय, निर्भीड आणि उमदे व्यक्तिमत्व असणारे आयुष्य एका काळ्या संध्याकाळी दु:खाच्या दरीत कोसळले. २७ नोव्हेंबर १९७३ ची संध्याकाळ माणुसकीला काळीमा फासणारी ठरली. केईएम हॉस्पिटलमधील डॉग सर्जरी शाखेच्या प्रमुख अरुणा शानबाग यांच्यासोबत रुग्णालयात कार्यरत असलेला सोहनलाल वाल्मिकी या कक्षसेवकाने त्यांच्यावर बलात्कार करून कुत्र्याला बांधण्यात येणाऱ्या साखळीने गळा आवळून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
शानबाग यांचा तेथेच कार्यरत असलेल्या एका डॉक्टरसोबत विवाह निश्चित झाला होता. परत्ांु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. म्हणूनच विवाहाच्या आधीच पंधरा दिवस तो जीवन संपवून टाकणारा प्रयत्न घडल्याचे त्यांनी सांगितले.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी गेली ४२ वर्षे अनेक अडचणींना सामोरे जात अरुणा शानबाग यांची शुश्रृषा करणाऱ्या केईएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी प्राचार्य नागराज सुनागर, शिवगौडा पाटील, विद्यानंद भंगावती, रुझाई गामा, किरण सावगावे, अपर्णा सनदी, शांती मेरयी, ममता कासले, शांभवी आजगावकर, प्रणाली मयेकर व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार प्रिया डिचोलकर यांनी मानले. त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)