अरुण मोर्ये यांचा प्रश्न राज्यात प्रथम
By Admin | Updated: November 4, 2015 00:08 IST2015-11-03T21:54:26+5:302015-11-04T00:08:27+5:30
पीक परिसंवाद २०१५ : खंडाळा येथील १२ शेतकऱ्यांचा सहभाग

अरुण मोर्ये यांचा प्रश्न राज्यात प्रथम
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य कृ षी विभाग आणि मुंबई दूरदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सगुणा बाग कर्जत, जि. रायगड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘पीक परिसंवाद २०१५’ या शेतीविषयक कार्यक्रमात खंडाळा - सत्कोंडी येथील प्रगतशील शेतकरी अरुण मोर्ये यांच्या प्रश्नाने प्रथम क्रमांक पटकावला.
रायगड येथे आयोजित करण्यात आलेल्या या पीक परिसंवादात कोकणातील शेतकरी सहभागी झाले होते. दक्षिण कोकणातील लाल मातीत शासकीय माती परीक्षण अहवालानुसार कोणती फुलशेती करावी? कोकणातील हवामानाचा, आर्द्रतेचा सदर फुलशेतीवर कोणता परिणाम होईल? व यासाठी शासकीय योजना कोणत्या? या प्रश्नाला प्रथम क्रमांक मिळाला. या प्रश्नाबद्दल मुंबई दूरदर्शनचे डेप्युटी जनरल मॅनेजर शिवाजी कुळसुंदकर यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला कृषी आयुक्त विकास देशमुख प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. दापोली कृषी विद्यापीठाचे सुभाष चव्हाण, राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉ. डी. डी. पवार, शेतीतज्ज्ञ व कृषिभूषण पुरस्कारप्राप्त चंद्रशेखर भडसावळे, दूरदर्शनचे डी. जी. एम. शिवाजी कुळसुंदकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
खंडाळा आणि परिसरातून जेएसडब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून कंपनीचे अधिकारी गणेश घोडके आणि सुधीर तेलंग यांनी या परिसंवादासाठी १२ शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवला होता. यामध्ये चाफेरीचे उपसरपंच आणि प्रगतशील शेतकरी दीपक बैकर, अरुण मोर्ये, सतीश थुळ, उदय जोग यांच्यासह १२ शेतकरी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि मुंबई दूरदर्शनतर्फे परिसंवादाचे आयोजन.
पीक परिसंवाद २०१५ मध्ये राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांचा सहभाग होता.
रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी - खंडाळा येथील शेतकऱ्यांचाही परिसंवादात सहभाग.
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अरूण मोर्ये यांचा सत्कार.