लांजात मंगलमय वातावरणात बाप्पाचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:36 IST2021-09-12T04:36:15+5:302021-09-12T04:36:15+5:30
लांजा : कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेचे सावट यावर्षीही गणेशोत्सवावर असतानाही या ...

लांजात मंगलमय वातावरणात बाप्पाचे आगमन
लांजा : कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेचे सावट यावर्षीही गणेशोत्सवावर असतानाही या संकटाला न भीता गणेशभक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया’, असा जयघोष करत मोठ्या उत्साहात गणपतीची प्रतिष्ठापना केली. लांजा तालुक्यातील घराेघरी गणरायाची मनाेभावे पूजा केली जात असल्याने वातावरण मंगलमय आणि भक्तिमय झाले आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा शिरकाव झाला आणि निर्बंधांच्या नियमांमध्ये उत्सव साजरे करण्याची वेळ आली. यावर्षी मार्च महिन्याममध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव झाल्याने चिंता वाढली होती. कोरोना रुग्णांमध्ये घट हाेत असली तरी अजूनही मुंबई - पुणे येथील उद्योगधंदे सुरळीत सुरू झालेले नाहीत. अनेकांच्या हाताला अजूनही काम नाही. त्यामुळे आर्थिक चणचण भासत आहे. मात्र, गणेशाेत्सवाचा उत्साह कायम आहे. अनेकांनी साधेपणाने उत्सव साजरा करत हाेते.
तालुक्यात एकूण १३,५४० गणपती बाप्पाचे आगमन झाले. दीड दिवसाचे गणपती १२५ त्यामध्ये २ सार्वजनिक गणेशमूर्ती आहेत. या गणपतींचे शनिवारी विसर्जन करण्यात आले. तर पाच दिवसांचे ११,५७०, सात दिवसांचे ५५० तर २ सार्वजनिक, अनंतचतुर्थी १,१३५ तसेच २ सार्वजनिक गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.
गणेश विसर्जनावेळी शासनाने दिलेल्या नियमानुसार पालन करून तालुक्यामध्ये विसर्जन केले जाणार आहेत.