सेनेचे आता कायमच स्वबळ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2016 01:24 IST2016-01-13T01:20:16+5:302016-01-13T01:24:23+5:30

रत्नागिरी नगरपरिषद : सेना - भाजपमधील मतभेद विकोपास

The army is now swab? | सेनेचे आता कायमच स्वबळ ?

सेनेचे आता कायमच स्वबळ ?

रत्नागिरी : नगरपरिषदेच्या प्रभाग २ अ मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेने यश संपादन करून येत्या नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा घंटानाद केला आहे. नगरपरिषदेतील सेना-भाजपमधील मतभेदांची दरी वाढली असून, येत्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरपरिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी सेनेने स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा सुरू आहे. रत्नागिरी नगरपरिषदेची चार वर्षांपूर्वी झालेली सार्वत्रिक निवडणूक सेना-भाजप यांनी युती करून लढवली होती. त्यावेळी रत्नागिरीकरांनी युतीला भरभरून मतदान केले होते. तब्बल २१ जागांवर युतीला विजय संपादन करता आला होता. त्यावेळी राज्यभरातही युती जोरात होती. सेना व भाजप या दोन्ही पक्षांनी आपसात सव्वा-सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी नगराध्यक्षपद व उपनगराध्यक्षपद वाटून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मिलिंद कीर यांना पहिल्या सव्वा वर्षासाठी नगराध्यक्षपद मिळाले.
दुसऱ्या सव्वा वर्षाच्या काळासाठी भाजपचे अशोक मयेकर यांनी नगराध्यक्षपद भुषविले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत युती तुटली व त्याचा परिणाम रत्नागिरी नगरपरिषदेतही झाला. सेनेला दुसऱ्या टप्प्यातील नगराध्यक्षपद न दिल्याने सेना व भाजपमध्ये त्यानंतर सातत्याने वाद सुरू आहेत. २ नोव्हेंबर २०१५ रोजी झालेल्या चार जागांच्या पोटनिवडणुकीतही सेना-भाजपची युती झाली नाही.
त्यानंतर १० जानेवारी २०१६ ला झालेल्या एका जागेच्या पोटनिवडणुकीतही सेनेने भाजपकडे पाठिंबा मागितला असता ती जागाच भाजपने मागितली. मात्र सेनेने त्यास नकार दिला. भाजपनेही सेनेच्या उमेदवाराविरोधात उमेदवार उभा केला. एकूणच भाजप व सेना या दोन्ही पक्षांतील रत्नागिरी नगरपरिषदेमधील मतभेद विकोपाला गेल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)


युती नकोच : नोव्हेंबरच्या निवडणुकीत सत्तास्थापनेची तयारी...
रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग २ अ मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेतील सर्वांनीच एकत्र येऊन सेना उमेदवाराला विजयी केले आहे. नगरपरिषदेत सेनेचे वर्चस्व निर्माण केले आहे. एकट्याच्या बळावरही अधिक मतांचा फरक मिळवून दाखविणाऱ्या सेनेने येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यातील सार्वत्रिक निवडणुकीतही ‘एकला चलो’रे ची तयारी सुरू केली आहे. भाजपशी युती नकोच असे शिवसैनिकांचे मत असून जे प्रभाग २ अ मधील पोटनिवडणुकीत घडले तेच नोव्हेंबरच्या पोटनिवडणुकीतही रत्नागिरीकरांच्या सहकार्याने घडेल, असा शिवसैनिकांना विश्वास वाटत असून, राष्ट्रवादी व भाजप सेनेच्या या आव्हानाला कसे तोंड देणार, याचीच चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: The army is now swab?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.