सेना, राष्ट्रवादीची झाकली मूठ?
By Admin | Updated: October 18, 2015 23:58 IST2015-10-18T22:08:22+5:302015-10-18T23:58:53+5:30
पालिका पोटनिवडणूक : किमान दोन जागा जिंकण्याचा खटाटोप!--रणसंग्राम

सेना, राष्ट्रवादीची झाकली मूठ?
प्रकाश वराडकर- रत्नागिरी नगरपालिकेच्या ४ जागांसाठी १ नोव्हेंबरला होत असलेल्या पोटनिवडणुकीत चारही जागांवर बाजी मारण्याचा सेना, राष्ट्रवादी कॉँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र, किमान दोन जागा जिंकून झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवण्याचा खटाटोप सेना, राष्ट्रवादीकडून सुरू आहे. त्यावरच उमेश शेट्ये व उदय सामंत यांचे राजकीय वजन ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
गेल्या आठवडाभरात झालेला प्रचार पाहता राष्ट्रवादी व शिवसेना या दोन पक्षांमध्येच ही कडवी झूंज होत आहे. चारही जागा जिंकण्याचा दावा दोन्ही पक्षांकडून सुरुवातीपासून केला जात होता. प्रचाराच्या दोन फेऱ्या पूूर्ण झाल्यानंतर निवडणुकीत नेमके काय होणार, याचे चित्र काही प्रमाणात स्पष्ट होऊ लागले आहे. चारही जागा जिंकणे सोपे नाही, हे सेना व राष्ट्रवादीचे नेते खासगीत मान्य करीत आहेत. मात्र, दोन जागा तर जिंकाव्याच लागतील. त्यामुळेच तर झाकली मूठ सव्वा लाखाची राखता येईल, अशी रणनीती सेना, राष्ट्रवादीकडून अमलात आणली जात आहे.
आधी सेनेत गेलेले उमेश शेट्ये पालिका पोटनिवडणुकीच्या तोंडावर पुन्हा राष्ट्रवादीत परतले. त्यामुळे फार चर्चेत नसलेल्या पोटनिवडणुकीला कलाटणी मिळाली. त्यानंतर गेल्या आठवड्यात उमेश शेट्ये व मिलिंद कीर यांच्यातील कडवट व शेलक्या भाषेतील आरोप - प्रत्यारोपांनी राजकीय प्रचाराचे वातावरण ढवळून निघाले आहे. या आरोपांबाबत जनतेतही चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादीत परतलेल्या उमेश शेट्ये यांना या पोटनिवडणुकीतील चारही जागा जिंंकून २०१६ची पालिका निवडणूक व २०१९ची विधानसभा निवडणूक यासाठी आपण प्रबळ दावेदार आहोत, हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना दाखवून द्यावे लागणार आहे. दुसरीकडे सेनेचे आमदार उदय सामंत यांच्यासाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यांच्या मतदारसंघात होत असलेल्या या पोटनिवडणुकीतील चारही जागा जिंकण्यासाठी त्यांनी आपल्या शिलेदारांना कामाला लावले आहे. भारतीय जनता पक्षाकडून पोटनिवडणुकीसाठी छुपा प्रचार सुरू आहे. प्रचारात त्यांच्याकडून आक्रमकपणा अद्यापतरी दिसून आलेला नाही. या चार जागा जिंंकल्याने नगरपालिकेतील सत्तेचे गणित बदलणार नसले तरी भावी काळातील राजकीय स्थैर्याचा पाया मात्र या पोटनिवडणुकीने घातला जाणार आहे. या निवडणुकीतील यश हे या दोन्ही नेत्यांचे त्यांच्या पक्षातील वजन वाढविणारे आहे. त्यामुळेच प्रचाराला गती आली आहे. प्रथम चारही जागा राष्ट्रवादीच जिंकणार असे वातावरण उमेश शेट्ये यांनी निर्माण केले होते. प्रभाग २ मधून उमेश शेट्ये यांची सून कौसल्या शेट्ये ही निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे तेथील दोन जागा जिंकण्यासाठी उमेश शेट्ये जीवाचे रान करीत आहेत. परंतु या प्रभागात शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते प्रचार करताना दिसून येत असून, या दोन्ही जागांवर जिंकणारच, असा दावा तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
काटों की टक्कर
रत्नागिरी नगर परिषद प्रभाग २ या महिला राखीव मतदारसंघातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी सेनेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे याठिकाणी काटों की टक्कर रंगण्याची चिन्हे आहेत.
चर्चा सुरु : साहेब आलेच नाहीत...!
एका पक्षाच्या नेत्यांकडून प्रचाराची नवीन टॅक्ट वापरली जात आहे. आपल्या प्रभागातील प्रलंबित विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी साहेब आपल्याला भेटायला येणार आहेत, निरोप संबंधितांना फोनवरून दिला जात आहे. मात्र, साहेब आलेच नाहीत, अशी स्थिती अनेक ठिकाणी घडल्याची चर्चा आहे. फोन करणारेच चर्चेला येतात, सोबत उमेदवारांना आणतात. त्यांना मतदारांच्या पायावर लोटांगण घालायला लावतात व मतांचा जोगवा मागून मागे फिरतात. न बोलावताही भेटायला येणार, असे सांगून साहेब भेटायला येत नसल्याच्या या प्रकाराची चर्चा रत्नागिरीत आहे.
उमेश शेट्ये-उदय सामंत यांची राजकीय वजनदारी ठरवणारी निवडणूक.
राष्ट्रवादी-शिवसेनेत कडवी झुंज.
भाजपकडून पोटनिवडणुकीसाठी छुपा प्रचार?