सेना आमदार एकवटले

By Admin | Updated: December 9, 2015 01:14 IST2015-12-09T01:13:50+5:302015-12-09T01:14:13+5:30

मुख्यमंत्र्यांना पत्र : नुकसानभरपाई हमीपत्राद्वारे द्यावी

Army Legislators assembled | सेना आमदार एकवटले

सेना आमदार एकवटले

रत्नागिरी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल २०१५मध्ये झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आंबा आणि काजू पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्याबाबतची शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई संमत्तीपत्राच्या जाचक अटीमुळे अडचणीत सापडली आहे. त्यामुळे ही नुकसान भरपाई हमीपत्राद्वारे मिळावी, अशी मागणी करणारे पत्र रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेनेच्या चार आमदारांनी आज (मंगळवार) नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
मागणीचे हे पत्र देणाऱ्या सेनेच्या आमदारांमध्ये राजन साळवी, उदय सामंत, सदानंद चव्हाण व वैभव नाईक यांचा समावेश होता. नुकसानग्रस्तांना शासनाकडून सिंधुदुर्गसाठी ३७ कोटी ९१ लाख ५६ हजार, तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७९ कोटी ५३ लाख ७५ हजार भरपाई मंजूर करण्यात आली. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात फळपीक बागायतदारांना २ हेक्टरच्या मर्यादेत प्रत्येकी २५ हजार भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याअंतर्गत सिंधुदुर्गमध्ये १२ कोटी ३५ लाख ५६ हजार ३९४ रुपये, तर रत्नागिरी जिल्ह्यात २७ कोटी ७१ लाख ६८ हजार ८६६ रुपये नुकसान भरपाईचे महसूल विभागाकडून वाटप करण्यात आले. संमत्तीपत्राच्या अटीमुुळे पूर्ण भरपाई बागायतदारांना मिळालेली नाही. त्यामुळे हमीपत्राद्वारे भरपाई दिली जावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)
खराब हवामान : सात वर्षे आंबा, काजू पिकाचे नुकसान...
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदारांसाठी महत्त्वाचे असलेले आंबा व काजू पीक गेल्या सहा ते सात वर्षांपासून अवकाळी पाऊस व लहरी हवामान यामुळे धोक्यात आले आहे. गेल्या हंगामात गारपिटीचाही सामना या पिकाला करावा लागला. त्यामुळे बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच संमत्तीपत्राची अडचण आल्याने बागायतदारांना अपूर्ण भरपाई मिळाली आहे.

Web Title: Army Legislators assembled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.