मुक्त विद्यापीठांतर्गत नवीन शिक्षणक्रमांना मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:33 IST2021-09-18T04:33:59+5:302021-09-18T04:33:59+5:30
रत्नागिरी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत यावर्षी सात लाखांहून अधिक विद्यार्थी संख्यावाढीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. चालू शैक्षणिक ...

मुक्त विद्यापीठांतर्गत नवीन शिक्षणक्रमांना मान्यता
रत्नागिरी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत यावर्षी सात लाखांहून अधिक विद्यार्थी संख्यावाढीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. चालू शैक्षणिक वर्षाकरिता विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ने एम.ए. मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, लोकप्रशासन आणि उर्दू या शिक्षणक्रमांना आणि एम. एस्सी आदी शिक्षणक्रमांना मान्यता दिल्याची माहिती कोल्हापूर विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार प्रा. डाॅ. आर. व्ही. कुलकर्णी यांनी दिली आहे.
याबाबत देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मुक्त विद्यापीठाचे ब्रीद ‘ज्ञानगंगा घरोघरी’ अशारीतीने सार्थ ठरताना दिसत आहे. मुक्त विद्यापीठाची पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला पात्र ठरत आहेत. तसेच राज्य पातळीवरील मुक्त विद्यापीठांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी संख्या असणारे हे एकमेव विद्यापीठ आहे. काेविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यापीठाने महाराष्ट्र शासनास भरीव आर्थिक मदतही केली असल्याचे त्यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कोल्हापूर विभागीय केंद्र जून १९९३ पासून कार्यरत आहे. या विभागीय केंद्राच्या कार्यकक्षेत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे चार जिल्हे येत असून, या चार जिल्ह्यांत २५० हून अधिक अभ्यास केंद्र कार्यान्वित आहेत. कोकणपट्ट्यातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सागरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मुक्त आणि दूरशिक्षण प्रणालीद्वारे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करावे यासाठी विद्यापीठ लवकरच रत्नागिरी येथे उपकेंद्र सुरू करणार आहे. रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शैक्षणिक लाभ मिळण्यासाठी रत्नागिरी उपकेंद्राचा मोठा उपयोग होणार आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
तसेच विविध शिक्षणक्रमांच्या विद्यार्थी संख्यावाढीसाठी कुलगुरूंच्या आवाहनानुसार कोल्हापूर विभागीय केंद्रांतर्गत असलेल्या अभ्यास केंद्रातील विद्यार्थी संख्येत लक्षणीय वाढ होण्यासाठी प्रचार व प्रसार करावा, असे आवाहन प्रा. डाॅ. आर. व्ही. कुलकर्णी यांनी केले आहे.