विवाह नोंदणीबाबत दिसते आहे जागरूकता!
By Admin | Updated: September 24, 2015 00:11 IST2015-09-23T21:54:05+5:302015-09-24T00:11:49+5:30
चिपळूण : १ हजार २२३ जणांकडून विवाह नोंदणी

विवाह नोंदणीबाबत दिसते आहे जागरूकता!
चिपळूण : भटजीसमोर केलेला विवाह सरकार दरबारी काहीवेळा ग्राह्य धरला जात नाही. शासनाच्या आदेशानुसार विवाह नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, नगर परिषद हद्दीत सन २००८पासून आतापर्यंत १ हजार २२३ जणांनी विवाह नोंदणी केली आहे. पूर्वीच्या काळी विवाह हे भटजींच्या समोरच केले जात असत. मात्र, शासकीय पातळीवर या विवाहांना मान्यता मिळावी, यासाठी विवाह नोंदणी कार्यालयात नोंद करणे बंधनकारक केले आहे. शासनस्तरावरून २००८पासून विवाह नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विवाह झाल्यानंतर ठराविक मुदतीत याची नोंदणी करावी लागते. या नोंदणीसाठी नगर परिषद कार्यालयात स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला आहे. ५ मे २००८ पासून खऱ्या अर्थाने विवाह नोंदणीला प्रारंभ सुरु झाला. यावेळी ४० जणांनी विवाह नोंदणी केली होती. विवाह नोंदणी करणे भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. याची जाणीव नवदाम्पत्य व त्यांच्या कुटुंबियांमध्ये निर्माण झाल्याने आता या विवाह नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन २००९मध्ये १३९, सन २०१०मध्ये १४५, सन २०११मध्ये १५५, सन २०१२मध्ये १५०, सन २०१३मध्ये २०८, सन २०१४मध्ये २०१ तर दि. १४ सप्टेंबर २०१५पर्यंत १८५ असे एकूण १ हजार २२३ जणांनी विवाह नोंदणी केली आहे. (वार्ताहर)
विवाह केल्यानंतर त्याची सरकार दरबारी नोंद होणे गरजेचे आहे. त्यासाठी २००८पासून नगर परिषद हद्दीत विवाह नोंदणी सुरू करण्यात आली आहे.