भूसंपादनाची अधिसूचना जाहीर

By Admin | Updated: December 10, 2015 00:48 IST2015-12-10T00:44:40+5:302015-12-10T00:48:23+5:30

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण : प्रांताधिकाऱ्यांनी दिली माहिती

Announcement of land acquisition notification | भूसंपादनाची अधिसूचना जाहीर

भूसंपादनाची अधिसूचना जाहीर

कुडाळ : राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवाच्या चौपदरीकरणात येणाऱ्या कुडाळ तालुक्यातील १८ गावांमधील भूसंपादनाची अधिसूचना जाहीर झाली आहे. या चौपदरीकरणात येणाऱ्या मंदिरांबाबत तेथील जनतेशी चर्चा करून मंदिर दुसरीकडे बांधण्याबाबत शासन व संबंधित एजन्सी मदत करेल, चौपदरीकरणाच्याबाबत हरकती घेता येथील चौपदरीकरणाबाबत कोणालाही न्यायालयात जाता येणार नाही, अशी माहिती पत्रकार परिषदेत कुडाळ प्रांताधिकारी रवींद्र बोंबले यांनी दिली
महामार्गाच्या चौपदरीकरणाची भूसंपादनाची अधिसूचना जाहीर झाली असून या संदर्भात रवींद्र्र बोंबले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कुडाळ तालुक्यातील १८ गावांमधील चौपदरीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीची मोजणी संबंधित राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग व महसूल प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन कायदा (१९५६) नुसार पूर्ण केली असून याबाबतचा तसा प्रस्ताव ही केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. आता कुडाळ तालुक्यात कसाल ते झाराप पर्यंत सुमारे ३१ किमीच्या महामार्गाचे सद्यस्थितीत चौपदरीकरण होणार असून याबाबतची भूसंपादन प्रक्रियेसाठी प्रशासनाने अधिसूचना जाहीर केली आहे. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या आतमध्ये ज्यांना हरकती घ्यायच्या आहेत त्यांना हरकती घेता येतील. हरकती घेतल्यानंतर ज्या विभागाचा तो प्रश्न असेल त्या विभागाकडे तो सोडविण्यासाठी पाठविण्यात येणार व त्यानंतर पुन्हा या भूसंपादनाच्या बाबतीत हरकतींवर सुनावणी घेऊन निर्णय देण्यात येणार आहे, अशीही त्यांनी माहिती दिली. कुडाळ तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, वनक्षेत्रपाल कडावल, वनक्षेत्रपाल मंडळ कृषी अधिकारी कुडाळ, कृषी पर्यवेक्षक कुडाळ, कृषी पर्यवेक्षक कडावल, कृषी पर्यवेक्षक माणगांव, वनविभाग, उपअभियंता वीज कंपनी कुडाळ, उपविभागीय अभियंता आदी विभागाचे अधिकारी महामार्गाच्या चौपदरीकरणात किती जनतेची घरे, झाडे, शेती बागायती, जंगलाचा काही भाग, दुकाने येतात त्याची प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी व मोजणीचे काम पूर्ण करताहेत. त्या संबंधित अहवाल लवकरच प्राप्त होईल व येत्या काही दिवसात भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल असेही रवींद्र बोंबले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)



रवींद्र बोंबले : आकारीपड जमीन सर्वेक्षण सुरू
कुडाळ तालुक्यातील आकारीपड जमिनींचे सर्वेेक्षण सुरू आहे. लवकरच तेथे स्थळपाणी जबाब घेऊन नोटीस बजावल्या जाणार आहेत. त्यानंतर ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना जमीन वहीवाटाबाबतचे ४0 वर्षापूर्वीचे पुरावे शासनाला सादर करावे लागणार आहेत. तसेच ज्यांच्या नावे जमिनी होणार व अशांनी अजूनही जमिनीचे बाजारमूल्य एक वर्षाच्या मुदतीत भरले गेले नाही तर अशांच्या जमिनीबाबत प्रशासन पुन्हा वेगळी भूमिका घेणार आहे, असेही रवींद्र बोंबले म्हणाले. यावेळी बोलताना बोंबले म्हणाले की, महामार्गाच्या चौपदरी करणात येणाऱ्या काही मंदिरांना काढावे लागणार असून या ठिकाणच्या मंदिरांबाबत तेथील जनतेशी चर्चा करून संबंधित मंदिर दुसरीकडे जमीन दिल्यास ते मंदिर बांधण्याबाबत शासन व संबंधित एजन्सी मदत करेल, असेही ते म्हणाले.


राष्ट्रीय महामार्गाचे असे होणार भूसंपादन
कुडाळ तालुक्यातील ३१ किलोमीटरच्या महामार्गाच्या चौपदरीकरणात सुमारे ७९ हेक्टर क्षेत्र जमीन जाणार असून ही जमीन सुमारे १५ हजार खातेदारांची आहे.
भूसंपादन हे राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन कायद्यानुसार होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग कायदा (१९५६) नुसार महामार्गाच्या चौपदरी करणाच्या कोणत्याही कामाच्या विरोधात कोणालाही न्यायालयात जाता येणार नाही.
ज्या ठिकाणी सातबारावर शासनाचे नाव नाही आहे त्याठिकाणी कमी जास्त बदल करून महामार्गासाठी लागणारी जमीन शासनाच्या नावावर करण्यात येणार आहे.
ज्यांची जमीन, घरे, बागायती, शेती, झाडे व इतर साधनसंपत्ती महामार्गाच्या चौपदरीकरणात गेली आहे त्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या नवीन कायद्यानुसार किमान साडेतीन पट मोबदला निश्चितच मिळणार आहे.
तालुक्यातील वाडीहुमरमळा, पणदूर, पावशी बोरभाट, बेलनदी, बांबार्डे तर्फ कळसुली, कसाल, रानबांबुळी,ओरोस बुद्रुक, कुडाळ, सांगिर्डे, गुढिपूर, पिंगुळी, टेंबधुरीनगर,बिबवणे, बांबार्डे तर्फ माणगांव, जांभरमाळा, झाराप ही १८ गावे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात येणार आहेत.

Web Title: Announcement of land acquisition notification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.