महामार्गावर माेकाट जनावरांचा वावर धाेकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST2021-07-18T04:23:05+5:302021-07-18T04:23:05+5:30
आवाशी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आवाशी (ता.खेड) पेट्रोल पंपापासून परशुराम घाटापर्यंत सध्या मोकाट व उनाड जनावरांचा वाढलेला वावर वाहन ...

महामार्गावर माेकाट जनावरांचा वावर धाेकादायक
आवाशी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आवाशी (ता.खेड) पेट्रोल पंपापासून परशुराम घाटापर्यंत सध्या मोकाट व उनाड जनावरांचा वाढलेला वावर वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. खेड तालुक्यात लोटेमाळपर्यंतचे काही अंशी काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे खेडहून लोटेकडे येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांची ये-जा सुरू आहे. या अंतरात येणाऱ्या प्रत्येक दोन गावांच्या सीमेवरील भाग पूर्ण व्हायचा शिल्लक असून, सोळा किलोमीटरच्या अंतरावरील काँक्रिटीकरण बऱ्यापैकी पूर्णत्वास गेले आहे.
झालेल्या काँक्रिटीकरणाच्या मार्गावरून दोन्ही बाजूने वाहनांची ये-जा सुरू असल्याने, साहजिकच वेगाची मर्यादा वाढलेली आहे. मात्र, याच मार्गावरील आवाशी येथील पेट्रोल पंप ते परशुराम स्थानकापर्यंत मोकाट पाळीव जनावरांचे जत्थेच्या जत्थे या वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच पावसाळा सुरू झाल्याने या शक्यतेत आणखीनच वाढ झाली आहे. त्यामुळे याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.