प्राणीमित्र - पर्यावरण संरक्षणाचा एक घटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:30 IST2021-04-11T04:30:14+5:302021-04-11T04:30:14+5:30
मार्च महिन्याचा तिसरा आठवडा तसा उष्णतेचा. मार्च महिन्याच्या उष्णतेमुळे व कोरोनाजन्य परिस्थितीमुळे सर्वच शाळा सकाळी भरल्या होत्या. माझीही शाळा ...

प्राणीमित्र - पर्यावरण संरक्षणाचा एक घटक
मार्च महिन्याचा तिसरा आठवडा तसा उष्णतेचा. मार्च महिन्याच्या उष्णतेमुळे व कोरोनाजन्य परिस्थितीमुळे सर्वच शाळा सकाळी भरल्या होत्या. माझीही शाळा सकाळी ७.३० वाजता सुरू झाली होती. लॉकडाऊनपूर्वी शिक्षकांच्या मनात कोरोनाची भीती होती. या कोरोनाच्या भीतीच्या वातावरणात दहावी व बारावीच्या पूर्व परीक्षाही सुरू झाल्या होत्या. परीक्षेचा पहिलाच दिवस. परीक्षा विभागाशी संबंधित शिक्षक परीक्षा विभागाच्या खोलीत जमा झाले होते. आज मात्र परीक्षा विभागाच्या कपाटाखालून कसला तरी आवाज येऊ लागला. पाहिले तर काय खारुताईची (शेकरू) चार नवजात पिल्ले.
‘शेकरू’ हा महाराष्ट्र राज्याचा ‘राज्यपशु’. कणाधारी असणारा सस्तन जातीचा हा प्राणी ‘कृंतक’या वर्गातील. तो प्राणी साधारण भीमाशंकरच्या व तळकोकणच्या प्रदेशात आढळतो. प्रामुख्याने फळे व फुलांतील मधूर रस हा आहार असणारा हा प्राणी तळकोकणात नारळ व पोफळीच्या बागेत आढळतो. पानगळीच्या जंगलात अढळस्थान असणारा हा प्राणी जंगल तोडीमुळे नैसर्गिक अधिवास संकटात आल्याने मानवी वस्तीत राहू लागला. त्यामुळेच माझ्या शाळेच्या इमारतीमध्ये ती खारुताई नेहमी दिसत असे. परीक्षेच्या पहिल्या दिवशी त्या पिल्लांची आई ती खारुताई मरण पावली. प्राणीप्रेमी असणारे आमचे सहकारी शिक्षक आशिष जाधव यांनी त्या चार अनाथ पिल्लांचे पालकत्व स्वीकारले.
आशिष जाधव हे प्राणीमित्र आहेतच तसेच ते पक्षीमित्र व निसर्गमित्रही आहेत. आमच्या शाळेतील सुंदर बगीचा त्यांनीच तयार केला आहे. दुर्मीळ औषधी वनस्पतींची लागवड करणे, वनस्पतींची जोपासना करणे हा त्यांचा छंदच आहे. वर्गामध्ये ‘पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा’ यासारख्या विषयाचे अध्यापन करताना ते नेहमी विद्यार्थ्यांना सांगतात की, पर्यावरणामध्ये उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर मानवाने आपल्याबरोबरच इतर सजीव घटकांचा विचार करुन केल्यास पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही व भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. सद्यस्थिती लक्षात घेता, पर्यावरणीय समस्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हानी होताना दिसत आहे. पर्यावरणातील प्रत्येक सजीव घटकाचे संवर्धन करणे ही आपली एक सामाजिक जबाबदारी आहे. मानव हा सुद्धा निसर्गाचा व पर्यावरणाचा एक घटक आहे. मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धीमान आहे. नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे. त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे मानवाचे आद्यकर्तव्य आहे, हे आपण ओळखले पाहिजे.
आशिष जाधव यांनी खारुताईच्या चार पिल्लांचे पालन-पोषण करताना अतिशय नाजूक हाताने त्या पिल्लांना हाताळले. त्यांना त्यांच्या आईचे छत्र मिळवून दिले. पिल्लांना उदरनिर्वाहासाठी दूध पाजून त्यांचे पालनपोषण केले. पिल्लांच्या निवासासाठी बास्केटमध्ये घरटे तयार केले. खारुताईची पिल्ले एक दोन दिवस उपाशी असल्याने व नंतर त्यांना ड्रॉपलरणे दुधाचे फीडिंग केल्याने चारपैकी तीन पिल्ले निमोनिया होऊन मरण पावली. दुर्मीळ असणाऱ्या खारुताईचे एक पिल्लू मात्र सदृढ झाले आहे. कालांतराने काही दिवसांनी पूर्ण सदृढ झाल्यानंतर ते खारुताईचे पिल्लू त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले जाईल. दुर्मीळ प्राण्यांच्या प्रजाती नष्ट झाल्याने पर्यावरणाची हानी होते. आशिष जाधव यांच्यासारख्या प्राणीमित्रांमुळे पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होते.
निसर्गातील वन्यप्राणी, पक्षी, वनस्पती जगले तर आपण जगणार हे माहीत असूनही निर्सगाची मोठ्या प्रमाणात हानी केली जात आहे. काहीजण मात्र निसर्गाचं रक्षण करण्याचे प्रयत्न करतात. कुठे एखादा पक्षी जखमी अवस्थेत आहे, असे कळल्यास त्याला आणून त्याच्यावर योग्य उपचार करून त्याला पुन्हा निसर्गाच्या हवाली केलं जातं. ‘निसर्ग विज्ञान’ ही संस्था अनेक प्राणी, पक्षी निसर्ग वाचवण्याचं काम करते. कुलकर्णी बंधूंसारखे प्राणीमित्र जखमी प्राणी सापडला तर त्याला घरी घेऊन येतात, त्याला वाचवतात. त्यांना एकदा नागाची अंडी सापडली. ती उबवून त्यातून नागांचा जन्म झाला. ते नाग त्यांनी जंगलात सोडले. अनेक लोक सरपटणारा प्राणी दिसला की मारतात. एकदा अजगराचं पिल्लू त्यांनी वाचवून जंगलात सोडले. अनेक पक्षी, प्राणी वाचवून हे निसर्गमित्र निसर्गसेवा करतात. निसर्गमित्र किंवा प्राणीमित्र हेच खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे रक्षण करतात. जाधव यांच्यासारखे प्राणीमित्र हेच खऱ्या अर्थाने पर्यावरण संरक्षणाचे प्रमुख घटक आहेत.
- प्रा. हनुमंत लोखंडे, आडिवरे हायस्कूल, राजापूर.