शासनाची दमडीही न मिळाल्याने चिपळुणातील व्यापाऱ्यांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST2021-09-02T05:08:32+5:302021-09-02T05:08:32+5:30
चिपळूण : शहर व परिसरात २२ जुलै रोजी आलेल्या महापुरात व्यापाऱ्यांच्या विविध घटकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. सरकारने व्यापारी ...

शासनाची दमडीही न मिळाल्याने चिपळुणातील व्यापाऱ्यांचा संताप
चिपळूण : शहर व परिसरात २२ जुलै रोजी आलेल्या महापुरात व्यापाऱ्यांच्या विविध घटकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. सरकारने व्यापारी व दुकानदार, व्यावसायिकांसाठी पन्नास हजारांची मदत जाहीर केली. मात्र, सव्वा महिन्याचा कालावधी उलटून गेला, तरी या व्यापारी व दुकानदारांना शासनाने जाहीर केलेली दमडीची मदतही मिळालेली नाही. यामुळे चिपळूण परिसरातील पूरग्रस्त व्यापारी व दुकानदार प्रचंड संतापले आहेत. या संतापाच्या भावनेतूनच त्यांनी बुधवारी तहसीलदारांना निवेदन दिले. शासनाने जाहीर केलेली मदतीची रक्कम न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोरच उपोषण छेडण्याचा इशारा येथील व्यापारी महासंघाने दिला आहे.
शहरासह, खेर्डी, कळंबस्ते, वालोपे, मिरजोळी, पेढे, मजरे काशी या परिसरात २२ जुलै रोजी महापुराचे पाणी भरले होते. महापुरात ९० टक्के चिपळूण बाधित झाले होते. तळमजला तसेच काही ठिकाणी पहिल्या मजल्यावर पाणी शिरले होते. यात नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. व्यापारी व दुकानदार यांचेही कोट्यवधींचे नुकसान झाले. व्यापारी अजूनही नुकसानीतून सावरलेले नाहीत. काही व्यापाऱ्यांची दुकाने अजून बंदच आहेत. व्यापारी बांधवांना उभारी मिळण्यासाठी शासनाने पन्नास हजारांची सरसकट मदत जाहीर केली होती. मात्र, अद्याप ही मदत वितरित झालेली नाही. त्यामुळे संतापलेल्या व्यापाऱ्यांनी बुधवारी तहसील कार्यालय गाठले.
यावेळी व्यापारी महासंघाचे अरुण भोजने म्हणाले की, सव्वा महिना होऊन गेला, तरी पूर परिस्थितीसाठी अजून नेते भेटीसाठी बोलवत आहेत आणि आम्ही जातोय. सव्वा महिना सरकारने काय केले? ५० हजार रुपयांसाठी किती लाचार व्हायचे? विमा नियमावलीमध्ये कवडीचाही बदल झाला नाही आणि होणारही नाही. कोणाचा विमा ताळेबंदानुसार नाही, कुणाच्या मालाचा विमा न काढता दुकानाचा केलेला आहे, कोणाच्या बँकेने विम्याचे नूतनीकरण केलेले नाही, कोणाचे पंचनामे चुकीचे आहेत, कोणाचा माल वाहून गेलाय, काही बँका पाण्यात गेल्यामुळे त्यांची इन्शुरन्स पॉलिसी मिळत नाही, अशी अनेक कारणे विमा कंपन्या देत आहेत. त्यातच शासनाने जाहीर केलेली मदत अद्याप दिलेली नाही.
निवेदन देताना व्यापारी महासंघाचे शिरीष काटकर, उदय ओतारी, अरुण भोजने, प्रकाश पवार आदी उपस्थित होते.
चौकट
५ टक्के कर्जाची घोषणाही हवेतच विरली
सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहे. अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांना ५ टक्क्यांनी कर्ज देण्याबाबत घोषणा करण्यात आली होती. मात्र, ही घोषणा हवेतच विरली आहे. अनेक दुकानदारांना नवीन मालाच्या खरेदीसाठी खिशात दमडी नाही. ते नव्याने उभारी घेणार तरी कशी? त्यामुळे ८ दिवसांत भरपाईची रक्कम व्यापाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. भरपाई जमा न केल्यास नाइलाजास्तव उपोषण छेडावे लागेल, असा इशाराही दिला आहे.
फोटो
चिपळूण व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना निवेदन दिले.