...अन् चिमुरड्या सुप्रियाला भेटली आज्जी!
By Admin | Updated: July 5, 2016 00:34 IST2016-07-04T21:37:58+5:302016-07-05T00:34:18+5:30
महाराष्ट्र आॅपरेशन मुस्कान-२ : दाभोळ पोलिसांमुळे झाली ताटातूट झालेल्यांची भेट

...अन् चिमुरड्या सुप्रियाला भेटली आज्जी!
दाभोळ : दाभोळ फेरीबोटीजवळ २९ जून २०१६ रोजी १० वर्षीय अनोळखी मुलगी आढळून आली होती. या मुलीला सुखरुपपणे तिच्या आजीच्या ताब्यात देण्यात दाभोळ पोलिसांना यश आले आहे. दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र आॅपरेशन मुस्कान २’ या अभियानांतर्गत ही कार्यवाही करण्यात आली.
२९ जून रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास १० वर्षीय अनोळखी मुलगी दाभोळ येथील फेरीबोटीजवळ एकटीच बसली होती. बराच वेळ झाला तरी ती एकाच जागी बसून होती. दाभोळ येथील फेरीबोटीवर कार्यरत कर्मचारी मोअज्जम निजामुद्दीन ताजी यांचे लक्ष तिच्याकडे गेले. त्या मुलीला घेऊन मोअज्जम ताजी यांनी दाभोळ पोलीस ठाणे गाठले व त्या मुलीला पोलिसांच्या स्वाधीन केले. याचदरम्यान दाभोळ पोलिसांचे ‘आॅपरेशन मुस्कान २’ हे अभियानसुद्धा सुरु होते.
दाभोळ पोलिसांनी त्या मुलीची चौकशी केली असता, तिने आपले नाव सुप्रिया रमेश वाघमारे (रा. भोमडी, ता. दापोली) असे सांगितले. पोलिसांनी तिच्याकडे वडिलांच्या मोबाईल नंबरची चौकशी केली असता, तिला तो सांगता आला नाही. मुलगी दापोली ठाण्याच्या हद्दीतील असल्याने दाभोळ पोलिसांनी दापोली पोलीस ठाण्याचे अंमलदार समीर सुर्वे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी भोमडीच्या सरपंच गीता रहाटे यांच्याशी संपर्क साधला व सुप्रियाच्या नातेवाईकांना दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात संपर्क करण्यास सांगितले.
अधिक चौकशी केली असता सुप्रिया हिने गुहागर तालुक्यातील साखरी त्रिशूळमध्ये कामाला असणाऱ्या आपल्या आजीकडे जात असल्याचे वडिलांना सांगितल्याचे समोर आले. दाभोळ पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु करुन साखरी त्रिशूळचे पोलीसपाटील तुरुक यांच्याशी संपर्क साधून मुलीची आजी पार्वती रामचंद्र वाघमारे हिला दाभोळ पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. सुप्रियाची आजी दाभोळ पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यानंतर दाभोळ पोलिसांच्या ताब्यात असणारी सुप्रिया तिच्या आजीच्या ताब्यात देण्यात आली. याबाबतचा तपास दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक गायकवाड, ठाणे जमादार टेमकर, पोलीस कॉन्स्टेबल आेंकार कटनाक, विलास साळवी, महिला पोलीस कर्मचारी खांबे यांनी करत ही मोहीम फत्ते केली आणि खऱ्या अर्थाने ‘आॅपरेशन मुस्कान २’ यशस्वी झाले. (वार्ताहर)
महाराष्ट्र आॅपरेशन मुस्कान-२ ही संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणारी मोहीम आहे. या मोहीमेद्वारे बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक त्या-त्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्यामुळेच सुप्रियाला तिचे घर सापडले.