मंडणगड : घरातून बोलावून दुचाकीवरून नेऊन एका प्रौढाला दोघांनी जबर मारहाण केल्याचा प्रकार समाेर आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी तालुक्यातील निगडी गावातील मारुती मंदिराजवळ येथे घडली. या मारहाणीप्रकरणी मंडणगड पाेलिसांनी दाेघांवर गुन्हा दाखल केला आहे.या मारहाणीबाबत नझीर मुतलीक कोंडेकर (वय ५३, रा. निगडी मोहल्ला, मंडणगड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संशयित जिशान अस्लम माटवणकर आणि निहाल अस्लम माटवणकर (दाेघेही रा. निगडी माेहल्ला, मंडणगड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित जिशान माटवणकर याने नझीर कोंडेकर यांना रविवारी रात्री १० वाजता घराबाहेर बोलावले. त्यानंतर नजीर काेंडकर यांना स्वत:च्या दुचाकीवरून निगडी गावातील मारुती मंदिराजवळ नेले. त्यानंतर या ठिकाणी अगोदरपासून उभा असलेल्या संशयित निहाल माटवणकर आणि जिशान माटवणकर या दोघांनी काेंडकर यांना शिवीगाळ करून धमकावून, लाकडी काठीने मारहाण केली.या मारहाणीसंदर्भात दोघांवर मंडणगड पोलिस स्थानकात भारतीय न्याय संहिता कलम ११२ (१), ३५२, ३५१ (२), ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश चव्हाण करीत आहेत.
Ratnagiri: मंडणगडात घरातून बोलावून नेऊन प्रौढाला जबर मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 15:52 IST