नव्या प्रस्तावांमध्ये सदानंद चव्हाण आघाडीवर, जाधव पिछाडीवर

By Admin | Updated: July 25, 2014 22:53 IST2014-07-25T22:47:43+5:302014-07-25T22:53:44+5:30

प्रस्तावित केलेल्या विकासकामांना अजूनही प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही.

Among the new proposals, Sadanand Chavan leads the front, Jadhav is behind | नव्या प्रस्तावांमध्ये सदानंद चव्हाण आघाडीवर, जाधव पिछाडीवर

नव्या प्रस्तावांमध्ये सदानंद चव्हाण आघाडीवर, जाधव पिछाडीवर

रत्नागिरी : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांच्या आमदारांनी २०१४-१५ या नवीन वर्षात आपल्या मतदारसंघातील विकासकामे प्रस्तावित केली आहेत. त्यात चिपळूण मतदारसंघाचे आमदार सदानंद चव्हाण आघाडीवर असून, त्यांची तब्बल २९२ कामे प्रस्तावित आहेत. सर्वांत कमी गुहागर विधानसभा मतदारसंघाचे भास्कर जाधव यांची केवळ ११ कामे प्रस्तावित आहेत. या नव्या वर्षात आतापर्यंत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांच्या १७ विकासकामांसाठी एकूण ४१,९४,९२८ रूपयांची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. उर्वरित चार आमदारांनी प्रस्तावित केलेल्या विकासकामांना अजूनही प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही.
आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी २ कोटी रूपयांची तरतूद असून, त्यातून आमदारांच्या मतदारसंघातील कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निधीची तरतूद केली जाते. २०१४ - १५ या सालाकरिता दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सूर्यकांत दळवी, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, गुहागरचे आमदार भास्कर जाधव, रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी या दोन कोटी निधीतून काही विकासकामे प्रस्तावित केली आहेत.
दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार सूर्यकांत दळवी यांनी दापोली, मंडणगड, खेडसाठी एकूण ७० कामे प्रस्तावित केली आहेत.
चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सदानंद चव्हाण यांनी संगमेश्वर, चिपळूण या दोन मतदार संघासाठी सर्वाधिक २९२ कामे प्रस्तावित केली आहेत.
गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी मात्र गुहागर, खेड आणि चिपळूण या आपल्या मतदार संघासाठी आतापर्यंत केवळ अकरा विकासकामे प्रस्तावित केली आहेत.
रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे आमदार पालकमंत्री उदय सामंत यांची ७१ कामे प्रस्तावित असून, त्यापैकी १७ कामांना एकूण ४१,९४,९२८ रूपये एवढी प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे या कामांसाठी आता निधी उपलब्ध झाला असून, संबंधित कार्यान्वयन यंत्रणेकडे तो वर्ग करण्यात येणार आहे. उर्वरित चार विधानसभा मतदार संघांच्या आमदारांची मात्र प्रस्तावित कामे अद्याप प्रशासकीय मंजुरीत अडकलेली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Among the new proposals, Sadanand Chavan leads the front, Jadhav is behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.