टवाळखोर मुलांमुळे अमोल घागची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST2021-05-12T04:32:20+5:302021-05-12T04:32:20+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील दहीवली बुद्रुक लिमेवाडी येथील बीएस्सी आयटी झालेल्या अमोल घाग याने आठवडाभरापूर्वी केलेली आत्महत्या ...

टवाळखोर मुलांमुळे अमोल घागची आत्महत्या
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यातील दहीवली बुद्रुक लिमेवाडी येथील बीएस्सी आयटी झालेल्या अमोल घाग याने आठवडाभरापूर्वी केलेली आत्महत्या ही वाडीतील टवाळखोर मुलांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे असल्याचा आरोप त्याचे वडील हेमकिरण घाग यांनी केला आहे. मृत्यूनंतर त्याच्या पाकिटातील चिठ्ठी व मोबाईलमधील ऑडिओ क्लिपमध्ये आत्महत्येचे कारण स्पष्ट होत आहे़ चिठ्ठी आणि मोबाईल पोलिसांकडे देऊन याबाबत चौकशी करण्याची अपेक्षा वडील हेमकिरण घाग यांनी व्यक्त केली आहे.
अमोलच्या वडिलांनी जबाबात म्हटले आहे की, अमोलने ५ मे रोजी गोठ्यामध्ये आत्महत्या केली होती. आकस्मिक मृत्यू म्हणून सावर्डे पोलीस स्थानकात याची नोंद झाली आहे. अमोल याचे शिक्षण बीएस्सी आय.टी. होते. तो लुपिन या औषध कंपनीमध्ये नोकरीला होता. त्यापूर्वी तो अल्वम या कंपनीत होता. ३० एप्रिलला त्याने लुपिन कंपनीचा राजीनामा दिला. तत्पूर्वी अनोम या औषध कंपनीमध्ये असताना तो व त्याचे त्याच कंपनीतील मित्र रवींद्र पांडे व योगेश पोतदार यांनी लिन्कलिन या फार्मा कंपनीचे डिस्ट्रीब्युटर देशमुख यांच्याकडून कंपनी विकत घ्यायचे ठरविले होते; परंतु कोरोनामुळे ती प्रक्रिया झाली नाही. त्या मुदतीत पांडे व पोतदार हे देशमुख यांच्या लिन्कलिन कंपनीमध्ये टक्केवारीवर काम करीत होते. अमोल याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या मोबाईलचा पासवर्ड याेगेशला पाठविला होता. अमोलचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याने त्या पासवर्डच्या आधारे अमोलचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये एक ऑडिओ क्लिप सापडली. त्या क्लिपमध्ये अमोलने आत्महत्या करण्यापूर्वी मित्रांसह चिठ्ठीमध्ये लिहिलेल्या वाडीतील काही लोकांनी त्याला मानसिक त्रास दिल्याचे म्हटले आहे.
अमोलचे ज्या मुलीशी वर्षभरापूर्वी लग्न ठरलेले होते त्या मुलीचे व अमोलचे वैयक्तिक संवाद, फोटो लिक होत होते. त्याबाबत वाडीतील टवाळ मुले त्याला विचारत असत. त्याची टिंगल करीत असत. तो त्याचा मोबाईल हॅक झाल्याचे आम्हाला सांगत असे म्हणून आम्ही त्याला तीन -चार मोबाईल बदलून दिलेले होते. तरीही त्याचा मोबाईल हॅक झाल्याचे त्याने ऑडिओ क्लिपमध्ये सांगितले आहे. तत्पूर्वी, अमोलला योग्य त्या परीने समजावण्याचा प्रयत्न केला. तू त्या टवाळ मुलांकडे लक्ष देऊ नकोस, असे सांगितले. आमच्या समाधानासाठी मानसपोचार तज्ज्ञांकडे उपचार केले; परंतु अमोलमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. त्याचे व त्याच्या होणाऱ्या पत्नीचे संवाद गावामध्ये लिक होत होते. त्यामुळे त्या टवाळ लोकांच्या त्रासामुळे अमोल मानसिकदृष्ट्या खचत चालला होता. त्यामुळे ज्यांनी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले त्यांची चौकशी करून कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी विनंती अमोलच्या वडिलांनी पोलिसांकडे केली आहे.