वाढत्या निर्बंधांमुळे आधीच बुडत्या एस. टी.चा पाय खोलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST2021-04-25T04:31:33+5:302021-04-25T04:31:33+5:30
रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे आधीच बुडत असलेल्या एस.टी.चा पाय आता ५० टक्केच भारमानाच्या निकषामुळे आणखीच खोलात गेला आहे. एका बाजूला ...

वाढत्या निर्बंधांमुळे आधीच बुडत्या एस. टी.चा पाय खोलात
रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे आधीच बुडत असलेल्या एस.टी.चा पाय आता ५० टक्केच भारमानाच्या निकषामुळे आणखीच खोलात गेला आहे. एका बाजूला कर्मचाऱ्यांच्या वेतनासह नियमित सर्व खर्च होत असताना दुसऱ्या बाजूला उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटल्याने एस.टी.चा तोटा वाढतच चालला आहे.
शासनाने कोरोनामुळे सुरुवातीला वीकेंड लॉकडाऊन घोषित केले. त्यानंतर कडक निर्बंध जारी करण्यात आले होते. पुन्हा त्यामध्ये बदल करून पूर्ण लॉकडाऊनच घोषित केले आहे. अत्यावश्यक सेवेअंतर्गत एस.टी.ला लॉकडाऊनमधून वगळण्यात आले असले तरी लॉकडाऊनमुळे प्रवासीच नसल्याने एस.टी.ची अवस्था बिकट झाली आहे.
गतवर्षी लॉकडाऊनमुळे एस.टी.ला चांगलीच आर्थिक झळ सोसावी लागली होती. त्यानंतर एस.टी.च्या उत्पन्नाची गाडी हळूहळू रुळावर येत असताना पुन्हा लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. भारमान शून्य असलेल्या मार्गावरील वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आली आहे. एस.टी.चे चालक वाहकांना हजेरीसाठी आगारात यावे लागत असले तरी पन्नास टक्के उपस्थितीनुसार ड्युटी लावण्यात येत आहे.
कोरोना संकटकाळात प्रवासी वाहतुकीसाठी चालक, वाहक तयार असतानाही प्रवाशांअभावी बहुतांश मार्गांवरील फेऱ्या बंद ठेवल्या जात आहेत. सध्या ७६ गाड्यांद्वारे ३५० फेऱ्या सुरू आहेत. २८ हजार किलोमीटर इतकाच प्रवास होत आहे. १० टक्क्यांपेक्षा कमी फेऱ्या सुरू असल्याने यावर्षीही आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
लॉकडाऊनपूर्व दैनंदिन एस.टी.च्या ६०० गाड्या धावत असल्याने ४ हजार २०० फेऱ्यांमुळे एक लाख ८० हजार किलोमीटर वाहतूक सुरू होती. प्रवासी संख्या दोन ते सव्वादोन लाखांच्या घरात असल्याने ४८ ते ५० लाखांपर्यंत उत्पन्न प्राप्त होत असे. मात्र, आता सध्या ७६ गाड्यांद्वारे ३५० फेऱ्या सुरू आहेत. त्यामुळे चार ते पाच लाखांचे उत्पन्न प्राप्त होत आहे.
..................
एकूण चालक - ९५५
वाहक - ७६९
चालक कम वाहक - १३६६
अन्य कर्मचारी - १४१०
चौकट
मंडणगड आगारातून ३, दापोली ३, खेड ७, चिपळूण १२, गुहागर ४, देवरूख ८, रत्नागिरी १६, शहरी ५, लांजा ४, राजापूर आगारातून १४ फेऱ्या दिवसाला सुटत आहे. ४४ आसनी क्षमता असली तरी केवळ २२ प्रवाशांच्या वाहतुकीसाठी परवानगी असून, त्याचे पालन करण्यात येत आहे.
..............
शासन निर्णयाचे पालन करण्यात येत असून, प्रवासी नसल्यामुळे दिवसाला जेमतेम ७६ गाड्यांद्वारे ३५० फेऱ्या सुटत आहेत. प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. फेऱ्या कमी असल्यामुळे चालक-वाहकांनाही नियमानुसार ड्युटी लावली जात आहे. वाहकांचा प्रवाशांशी थेट संपर्क येत असल्याने योग्य खबरदारीचे आवाहन केले आहे.
- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी.