लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : घरगुती गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडू लागले आहेत. आधीच सिलिंडरच्या वाढीव दराने तोंडाला फेस आणला असतानाच घरपोच सेवेसाठी अधिक दरही द्यावा लागतो. तसेच डिलिव्हरी बाॅयला वेगळी टीप द्यावी लागते. आधीच महागाईने त्रस्त केले असतानाच या वाढीव रकमेचा भुर्दंड कशाला, अशी विचारणा नाराज गृहिणींकडून करण्यात येत आहे.
गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरचे दर भरमसाठ वाढू लागले आहेत. कोरोना काळात आधीच काहींच्या नोकऱ्या, रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच ऐन कोरोना काळात गेल्या वर्षापासून घरगुती गॅस सिलिंडर ६०५ रुपयांवरून ८७१ रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या वर्षभरात सुमारे २५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आणखी घरपोच सेवेसाठी पैसे घेतले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
................................
वितरक काय म्हणतात?
ठरावीक अंतरापेक्षा अधिक अंतरावर घरपोच सेवेसाठी जिल्हा प्रशासनाकडूनच जादा कर निश्चित केला गेला आहे. त्यानुसारच गॅस वितरक जादा दर लावतात. शहरी हद्दीत ही वाढ नाही. तसेच डिलिव्हरी बाॅय सिलिंडर घरपोच सेवा देताना काही ग्राहकांकडून त्यांना स्वेच्छेने दहा-वीस रुपये देतात. डिलिव्हरी बाॅयने मागणी केल्यास ते चुकीचे आहे.
- स्मिता परांजपे, वितरक
डिलिव्हरी बाॅय काही इमारतींना लिफ्ट नसली तरी अगदी तिसऱ्या मजल्यापर्यंत डोक्यावर सिलिंडर घेऊन पायऱ्या चढून जातो. त्यामुळे काही ग्राहक स्वेच्छेने त्यांना दहा-पंधरा रुपये देतात. तसेच ठरावीक अंतराबाहेर घेतले जातात, ते प्रशासनाकडून ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच. त्याव्यतिरिक्त वितरक अधिक पैसे घेत नाहीत, असे मला वाटते.
- भीमसेन रेगे, वितरक, रत्नागिरी
...............................
वर्षभरात २५० रुपयांची वाढ
गेल्या सप्टेंबर महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १४.२ किलोसाठी ६०५ ते ६६५ रुपये इतकी द्यावी लागत होती. त्यात प्रत्येक महिन्याने वाढ होत गेली. गेल्या वर्षभरात ही वाढ २०० ते २५० रुपयांच्या घरात पोहोचली आहे. सप्टेंबर महिन्यातच ५० रुपयांची वाढ झाली आहे. प्रत्येक महिन्यात एवढी वाढ होणार असेल तर सामान्यांना घरगुती गॅस परवडणारा आहे का? सामान्य माणसाच्या अत्यावश्यक गरजाच इतक्या महागल्या तर जगायचे कसे, असा प्रश्न नागरिकांकडून करण्यात येत आहे.
...............................................
डिलिव्हरी बाॅयला आणखी वेगळे पैसे कशासाठी?
आधीच कोरोनाचे संकट सुरू आहे. त्यातच विविध जीवनोपयोगी वस्तूंची दरवाढ दिवसेंदिवस होतच आहे. गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरचे दर भरमसाठ वाढले आहेत. त्यातच घरी सिलिंडर आणून देणाऱ्या डिलिव्हरी बाॅयलाही प्रसंगी २० रुपये द्यावे लागतात. आधीच दर भरमसाठ वाढलेत, मग हे आणखी कशासाठी?
शमिका लाड, रत्नागिरी
विविध वस्तूंच्या वाढत्या दराबरोबरच इंधनाचे दरही गगनला भिडू लागले आहेत. गेल्या वर्षभरात जीवनावश्यक वस्तूंचे दर अधिकाधिक वाढू लागले असतानाच घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढू लागले आहेत. वर्षभरात २०० ते २५० रुपयांनी वाढले आहेत. त्यातच घरी आणून दिल्यास अधिक पैसे मोजावे लागतात.
- श्रीराम माने, पावस