अलोरेत रोज नवे व्यापारी स्टॉल
By Admin | Updated: November 5, 2014 00:07 IST2014-11-04T21:20:16+5:302014-11-05T00:07:49+5:30
शासनाला आव्हान : प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची जागृती

अलोरेत रोज नवे व्यापारी स्टॉल
शिरगाव : अलोरे बाजारपेठ व अन्य ठिकाणी असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, एका व्यक्तीकडे एकपेक्षा अधिक असलेले व्यापारी गाळे शासनाने परत घ्यावे आणि प्रकल्पग्रस्तांना द्यावेत, अशी भूमिका घेऊन स्थापन करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने केलेल्या जागृतीमुळे शासनाला आव्हान देत तीन नवीन पक्के स्टॉल्स अलोरेत उभारण्यात आले आहेत.
आचारसंहिता व दिवाळी संपल्यानंतर अलोरे पिकअप शेडशेजारीच लोखंडी स्टॉल्स एका रात्रीत बसविण्यात आले. अनधिकृत बांधकामांना नळ व वीज कनेक्शन देणार नाही, असे स्पष्ट झाल्यामुळे सार्वजनिक नळाचा वापर व इनव्हर्टरचा पर्याय नवीन गाळेधारकांनी शोधला आहे.
यामुळे मुख्य बाजारपेठ अडगळीत राहून प्रमुख रस्त्यावरील सर्व जागा अनधिकृतपणे व्यापारासाठी वापरली जाणार आहे. जलसंपदा खात्याने अलोरेतील लक्षवेधी व तंटापूरक विषयाबाबत कोणतीच भूमिका गांभिर्याने न घेतल्याने शासन संपादित जागा वादाला कारण ठरत आहे. अधिकाऱ्यांना मागच्या वर्षातील बांधकामाकडे बोट दाखवून गप्प करण्याची धमक व नवीन स्टॉल्स तयार करण्याची तयारी असलेले तरुण अलोरेत कोणता व्यवसाय कुठे करावा? याचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)