चंदनाचा हार अन् चांदीच्या करंडकातून मानपत्र; तब्बल ९७ वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांचा रत्नागिरीत झाला होता सत्कार

By शोभना कांबळे | Published: March 1, 2024 11:42 AM2024-03-01T11:42:52+5:302024-03-01T11:43:10+5:30

शहरातील पटवर्धन प्रशालेच्या भव्य पटांगणावर स्वातंत्र्यलढ्याच्या अनुषंगाने त्यांचे भाषण झाले

Almost 97 years ago, Mahatma Gandhi was felicitated in Ratnagiri | चंदनाचा हार अन् चांदीच्या करंडकातून मानपत्र; तब्बल ९७ वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांचा रत्नागिरीत झाला होता सत्कार

चंदनाचा हार अन् चांदीच्या करंडकातून मानपत्र; तब्बल ९७ वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांचा रत्नागिरीत झाला होता सत्कार

शोभना कांबळे

रत्नागिरी : स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी रत्नागिरीत १ मार्च १९२७ रोजी आलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे तत्कालीन रत्नागिरी जिल्हा लोकल बोर्डाने चंदनाचा हार व मानपत्राने त्यांचे स्वागत केले. या मानपत्राचा चांदीचा करंडक येथील थरवळ कुटुंबीयांनी अजूनही जतन केला आहे. या करंडकाला शुक्रवार, १ मार्च २०२४ रोजी ९७ वर्षे पूर्ण होत आहेत. हा वसा पुढच्या पिढ्याही जतन करणार आहेत.

रत्नागिरीतील तेव्हाचे प्रसिद्ध वकील व्ही. डी. जोशी यांच्या खालची आळी येथील भागीरथी निवासात महात्मा गांधी २९ फेब्रुवारी १९२७ रोजी उतरले होते. गांधीजींना पाहण्यासाठी रत्नागिरीकरांंची अलोट गर्दी होती. दुसऱ्या दिवशी १ मार्च १९२७ रोजी शहरातील पटवर्धन प्रशालेच्या भव्य पटांगणावर स्वातंत्र्यलढ्याच्या अनुषंगाने त्यांचे भाषण झाले. यावेळी जिल्हा लोकल बोर्डाच्या वतीने त्यांचा चंदनाच्या हाराने आणि चांदीच्या करंडकातून मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

त्याकाळी मानसन्मान केलेल्या वस्तूंचा लागलीच लिलाव करून गोळा झालेला निधी स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी वापरण्यात येत असे. गांधीजींनी प्रघाताप्रमाणे या चंदनी हार, मानपत्र व करंडकाचा त्याच जागेवर लिलाव केला. रत्नागिरीतील सुस्वभावी प्रसिद्ध व्यापारी गणपतशेठ थरवळ यांनी हा सन्मान त्याकाळी ५०० रुपयाला विकत घेतला. शुक्रवारी, १ मार्च रोजी या घटनेला ९७ वर्षे पूर्ण होत आहेत.

गांधीजींच्या या भेटीपासून गणपतशेठआणि मुकुंद व विश्वनाथ ही त्यांची दोन मुले देशभक्तीने भारावलेली होती. विश्वनाथ तर या सोहळ्याचे साक्षीदार होते. मुकुंदराव यांनी तर मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला होता. कारावासही भोगला होता. गणपतशेठ यांनी गांधीजींच्या या चांदीच्या करंडकाचे जीवापाड जतन केले. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव आणि रत्नागिरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ हा करंडकाचा ठेवा जतन करीत आहेत.

भारताच्या स्वातंत्र्ययुद्धातील एक योगदान तसेच महात्मा गांधी यांच्या रत्नागिरीतील पदस्पर्शाची आठवण म्हणून हा ठेवा सुभाष थरवळ जतन करीत आहेत. यानंतरही मुलगा मनीष आणि नातू सिद्धार्थ आणि त्या पुढच्याही पिढ्यान् पिढ्या हा ठेवा तेवढ्याच अभिमानाने जतन करतील, असा प्रगाढ विश्वास सुभाष थरवळ यांना आहे.

करंडक अजूनही तसाच 

चंदनी हार काळाच्या ओघात खराब झाला. मात्र, चांदीचा करंडक अजूनही तसाच आहे. या करंडकावर ‘महात्मा गांधीजींस - रत्ननगरीत त्यांचे शुभगमनप्रसंगी रत्नागिरी लोकल बोर्डाकडून सादर अर्पण. १ मार्च १९२७,’ असा मजकूर लिहिलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला गांधीजींच्या चरख्याचे चित्र रेखाटलेले आहे.

थरवळ घराणे गांधींच्या विचारांनी प्रेरित झालेले होते. त्यामुळे त्यांना सन्मानात मिळालेल्या करंडकाचेही आतापर्यंत अभिमानाने जतन करण्यात आले आहे. यापुढच्या पिढ्याही हा बहुमोल ठेवा तेवढ्याच अभिमानाने नक्कीच जतन करतील. -सुभाष थरवळ, रत्नागिरी

Web Title: Almost 97 years ago, Mahatma Gandhi was felicitated in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.