चिपळूण : तौक्ते वादळानंतर आता १५ दिवसांवर मान्सून येऊन ठेपला आहे. कोकणात मान्सूनच्या पार्श्वभूमीवर बेगमीची जुळवाजुळव करावी लागते. ही बाब लक्षात घेता शासन व जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांना नियम व अटीअंतर्गत व्यवसाय सुरू करण्याबाबत परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष व नगरसेवक आशिष खातू यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
याबाबत खातू यांनी शासनाकडे विनंती करताना, गेले वर्षभर संसर्गकाळात लॉकडाऊनमुळे व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. गतवर्षी सुमारे सहा महिन्यांचा व्यवसायाचा हंगाम लॉकडाऊनमध्ये गेला. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आता रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये झाला असल्याने पुन्हा लॉकडाऊनची शक्यता आहे. त्यापेक्षा व्यापाऱ्यांना सवलत दिल्यास काटेकोर नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी व्यापारी घेऊ शकतात. ही बाब लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने व्यापारी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांना आर्थिकदृष्ट्या सावरण्यासाठी व्यवसाय सुरू करण्याबाबत सवलत द्यावी.
व्यवसाय सुरू करताना संबंधित व्यापाऱ्यांवर काटेकोर संसर्ग संदर्भातील नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत निर्देश देण्यात यावेत. तसेच सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत एक दिवसआड असे आठवड्यातून तीन दिवस व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळावी. तसेच उर्वरित दोन दिवस अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय सुविधा वगळता, सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे नियोजन केल्यास व्यापाऱ्यांना दिलासा मिळण्याबरोबरच संसर्ग प्रसार रोखण्यासाठी नियोजन होऊ शकते, अशी विनंती खातू यांनी केली आहे.