शेतकऱ्यांना भाजीपाला, कडधान्य बियाण्यांचे वाटप
By Admin | Updated: November 18, 2015 00:15 IST2015-11-17T23:26:58+5:302015-11-18T00:15:05+5:30
पी. एन. देशमुख : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा उपक्रम; भातशेतीला जोडधंदा म्हणून रब्बी हंगामात मदत

शेतकऱ्यांना भाजीपाला, कडधान्य बियाण्यांचे वाटप
रत्नागिरी : भाजीपाला व कडधान्य क्षेत्र वाढवून शेतकऱ्यांचा आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुुदानावर ११ क्विंटल बियाण्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी दिली. भातशेतीला जोडधंदा म्हणून रब्बी हंगामामध्ये भाजीपाला व कडधान्याचे जास्तीत जास्त उत्पादन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावे, यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात भाजीपाला व कडधान्य कमी प्रमाणात होत असल्याने तो घाटमाथ्यावरून येतो. अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या या मालाला मोठ्या प्रमाणात भाव मिळत असल्याने तेथील शेतकरी सधन झाला आहे. आपल्या जिल्ह्यातही भाजीपाला व कडधान्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भातशेतीनंतर रब्बी हंगामामध्ये भाजीपाला, कडधान्य आदींचे पीक घेतल्यास स्थानिक बाजारपेठेत त्यांना चांगला भाव मिळून त्यांच्या आर्थिक फायदाही होईल. यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी भाजीपाला व कडधान्यांचे बियाणे ५० टक्के अनुदानावर लवकरच वाटप करण्यात येणार आहे. हे बियाणे कोकण कृषी विद्यापीठाकडून उत्पादित केलेले असल्याची माहिती पी. एन. देशमुख यांनी दिले. (शहर वार्ताहर)
५० टक्के अनुदानावर औषधे, कीटकनाशके पुरवणार
राज्य पुरस्कृत पीक संरक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद कृषी विभागाने नियोजन विकास मंडळामार्फत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये पीक संरक्षण औषधासाठी ४० लाख रुपयांची तरतूद केली आहे. रोग व कीड नियंत्रणासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून पीक संरक्षण औषधाचा व कीटकनाशकाचा पुरवठा करण्यात येणार आहे. ८३६६ लीटर्स कीटकनाशके, औषधे ५० टक्के अनुदानावर वाटप करणार आहेत.
शेतकऱ्यांना आवाहन
चवळी, भेंडी, घेवडा, माठ, वाल, कुळीथ, मोहरी, काकडी, कारली, पडवळ, शिराळी, दुधी भोपळा, घोसाळी, मिरची, वांगी, मुळा, वाली आदिंचे बियाणे ५० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. या बियाण्यांची शेतकऱ्यांनी उचल करावी, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी पी.एन. देशमुख यांनी केले आहे.