कामगारांना धनादेश वाटप

By Admin | Updated: August 17, 2014 22:33 IST2014-08-17T21:42:29+5:302014-08-17T22:33:06+5:30

गुहागर तालुका : एक कोटी १ लाखाचे वितरण

Allocation of checks to workers | कामगारांना धनादेश वाटप

कामगारांना धनादेश वाटप

गुहागर : तालुक्यातील तब्बल १,०१७ घरेलू कामगारांना प्रत्येकी १० हजारांचा धनादेश नुकताच प्रदान करण्यात आला. कामगारमंत्री भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
पंचायत समितीच्या सभागृहात धनादेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धनादेश घेऊन जाण्यासाठी आलेल्या महिला - पुरुषांनी सभागृह तुडूंब भरुन गेले होते. शिवाय पंचायत समितीचा संपूर्ण आवार गर्दीने फुलून गेला होता. गावागावातून आलेल्या तब्बल १,०१७ घरेलू कामगारांना प्रत्येकी १० हजार याप्रमाणे १ कोटी १ लाख ७० हजार एवढ्या रकमेचे धनादेश वितरीत करण्यात आले.

कामगार खात्याचा कारभार हाती घेतला तेव्हा राज्याच्या सुरक्षा मंडळात कोकणातली १० सुद्धा माणसं नव्हती. आज तिथे आपल्याकडच्या ६५० जणांची नोंदणी घेतली आहे, असा दावा यावेळी भास्कर जाधव यांनी केला.
नियोजित मार्गताम्हाणे एमआयडीसीवरुन आपल्याविरुद्ध वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. एमआयडीसी आणल्यास निवडणुकीत विरोधात जाऊ, अशी धमकी देण्यात येत आहे. पण, एमआयडीसीसाठी जास्त जागा आम्ही घेणार नाही. घरं, बागायती, गावठाण उठवणार नाही, एवढं करुन ४ ते ५ हजार स्थानिकांना रोजगार मिळेल, अशी प्रदूषणविरहीत टेक्स्टाईल पार्क आपण उभारत आहोत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या हाताला काम मिळणार असेल तर मला निवडणुकीच्या हार-जीतची पर्वा नाही. टेक्स्टाईल पार्क आणणारंच, असे जाधव यांनी सांगितले.
आता मच्छिमार समाजासाठी कल्याण मंडळाची स्थापना झाली आहे. या मंडळाची अधिसूचना जारी झाली आहे. येत्या काही दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन होईल, असे जाधव म्हणाले. या मंडळाच्या माध्यमातून तालुक्यातील खारवी समाजाला आर्थिक व इतर फायदे मिळवून देण्यासाठी अर्ज भरुन घ्या, अशी सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केली.कार्यक्रमाला सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, गुहागरचे नगराध्यक्ष जयदेव मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर, उपसभापती राजेश बेंडल, उपनगराध्यक्ष स्नेहा वरंडे, तहसीलदार वैशाली पाटील, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संतोष वरंडे, महिला शहर अध्यक्ष मानसी शेट्ये उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Allocation of checks to workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.