गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:38 IST2021-09-10T04:38:29+5:302021-09-10T04:38:29+5:30

रत्नागिरी : कोविडच्या काळात होणारा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. या ...

All the systems of the district administration are ready for the smooth passage of Ganeshotsav | गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणा सज्ज

गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणा सज्ज

रत्नागिरी : कोविडच्या काळात होणारा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. या काळात जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमानी मंडळींचा खोळंबा होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. कोविडचा प्रसार होणार नाही यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबईकर मंडळी येण्यापूर्वीच आरोग्य तपासणी करून येत आहेत. त्यामुळे चाचणी अल्प प्रमाणात करावी लागत आहे. सर्व यंत्रणांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासन गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहे.

१८ वर्षांखालील युवक, बालक यांसह दोन लस घेणाऱ्या व्यक्ती आणि प्रवासापूर्वी ७२ तास आधी आरसीपीटीआर चाचणी निगेटिव्ह असणाऱ्यांना थेट प्रवेश आहे. याखेरीज येणाऱ्या इतरांचे पत्ते नोंदवून घेण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. रेल्वेस्थानक तसेच जिल्ह्यात येताना ॲन्टिजन करण्यासाठी वेळ असेल अशा सर्वांसाठी यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. त्या ठिकाणी तपासणी न करणाऱ्यांना त्यांच्या गावांमध्ये तपासणी करता येणार आहे. तपासणीत पॉझिटिव्ह असल्यास संस्थात्मक विलगीकरणाची सोय आहे.

जिल्ह्यात ११४ सार्वजनिक गणपती व १ लाख ५६ हजार घरगुती गणपतींची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पूर्ण गणेशोत्सव काळात पाच दिवस मुंबई-गोवा महामार्गावरील जड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या सर्व वाहनांना पथ करात (टोलमाफी) माफी देण्याचा शासन निर्णय झाला आहे. त्यामुळे गणेशभक्तांना अधिक दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सव काळात येणाऱ्या वाहनांची गर्दी टाळण्यासाठी २३ ठिकाणी मंडप टाकून व्यवस्था करण्यात आली आहे. दुर्घटना घडल्यास तत्काळ मदत करणारी यंत्रणा कार्यरत राहणार आहे.

सर्व महामार्गावरील धोकादायक वळणांवर सूचना फलक लावण्यासह झाडांची सफाई करून दृश्यमानता जादा राहण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात आले आहेत. सोबतच महामार्गावर परिवहन विभागाची पथकेही कार्यरत राहणार आहेत. गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस दलातर्फे २५० बैठका आतापर्यंत घेण्यात आल्या आहेत. यामध्ये १७ मंडळस्तर बैठका, १८ शांतता कमिटीच्या बैठका, मोहल्ला कमिटीच्या २२ बैठका, पोलीस पाटील स्तरावरील १९ बैठका, समन्वयासाठी ६ बैठका घेतल्या आहेत. पोलीस अधिकारी यांनी मोठ्या गावात घेतलेल्या १७२ बैठका यांचा समावेश आहे. गणेशोत्सव कालावधीतही बैठका होणार आहेत.

पोलीस दलाने ग्राम दत्तक योजनेत ५० गावे घेतली आहेत. या सर्व गावांमध्ये गणेशोत्सव काळात कोविड नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती आणि खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकांवर बंदी आहे. या अनुषंगाने गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे. विसर्जन कालावधीत अनेकदा बुडण्याच्या घटना घडतात. जीवितहानी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे काही किनाऱ्यांवर जीवरक्षकांची मदतही घेण्यात येणार आहे.

गणेशोत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे साजरा व्हावा, यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. तसेच कोरोना नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: All the systems of the district administration are ready for the smooth passage of Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.