दुग्धोत्पादन वाढीसाठी सर्वांनी एकत्र यावे
By Admin | Updated: December 2, 2015 00:43 IST2015-12-01T22:33:52+5:302015-12-02T00:43:21+5:30
राधाकृष्णन बी. : जिल्हाधिकाऱ्यांची सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक

दुग्धोत्पादन वाढीसाठी सर्वांनी एकत्र यावे
रत्नागिरी : जिल्ह्यातील दुग्धोत्पादन वाढीसाठी सर्व दूध उत्पादक सहकारी संस्थांनी एकत्रित यावे आणि दुधाच्या उत्पादनात भरीव वाढ करावी, यासाठी शेतकऱ्यांना पाणी, चारा, पशुखाद्य, वाहतूक, गाई-म्हशी खरेदीसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. जिल्ह्यातील दूध उत्पादनात भरीव वाढ होण्याच्या दृष्टीने लांजा व संगमेश्वर तालुक्यातील दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. बैठकीला सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन) डॉ. सुभाष म्हस्के, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुधोत्पादन) एस. के. कांबळे, अग्रणी बँक-बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक संजय बांदिवडेकर, नाबार्डचे व्ही. एस. पाटील, लांजा दूध उत्पादक सहकारी संस्थेचे चेअरमन शामराव पानवलकर, कोसुंब दूध उत्पादक सहकारी संस्थेचे अशोक जाधव, आदर्श दूध उत्पादक सहकारी संस्था, काटवलीचे अ. वि. जाधव, श्री देव बोरेश्वर दूध उत्पादक संस्थेचे मुरलीधर बार्इंग तसेच लांजा व संगमेश्वर तालुक्यातील अन्य दुग्ध उत्पादक सहकारी संस्थांचे चेअरमन उपस्थित होते. सध्याच्या स्पर्धात्मक जगात स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येकाने तयारी ठेवणे गरजेचे असून, यासाठी दर्जेदार उत्पादनाबरोबरच नियमितता आणि पारदर्शकता महत्त्वाची आहे. प्रत्येक सहकारी दुध उत्पादक संस्थेने आपले ८० टक्के सभासद हे दुध उत्पादक कसे होतील, याकडे जास्तीत जास्त लक्ष पुरवावे. या ३० संस्थांमधून दररोज कमीत कमी २५,००० लीटर्स दूध संकलन झाले पाहिजे. दर्जेदार आणि जास्तीत जास्त दुधाचे उत्पादन मिळाल्यास, दुधाचे दर वाढविणे शक्य होईल. गिऱ्हाईकांनाही दर्जेदार दूध मिळेल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याच्या गावात असणाऱ्या शासनाच्या विविध योजनांचाही लाभ प्राधान्याने देण्यात येईल, त्याचबरोबर शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विविध सुविधा लॉटरी पध्दतीने शेतकऱ्यांना दिल्या जातील, असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. सर्व उपस्थित चेअरमन यांनी दिलेल्या आश्वासन पाहता येत्या सहा महिन्यात दुग्धोत्पादनात वाढ झालेली दिसेल, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना दोन दुभती जनावरे खरेदी, खाद्य आदींसाठी अनुदानाच्या स्वरुपात मदत करण्यात येईल. तसेच पशुवैद्यकीय सेवा आणि अन्य सुविधांही उपलब्ध करुन देण्यात येतील, असे सहकारी संस्था व पशुसंवर्धन विभागातर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)