सर्वच सरपंच एकवटले

By Admin | Updated: October 24, 2015 00:41 IST2015-10-23T21:30:05+5:302015-10-24T00:41:46+5:30

दापोली : घरपट्टी वसुली स्थगितीविरोधात एल्गार

All the sarcens gathered together | सर्वच सरपंच एकवटले

सर्वच सरपंच एकवटले

दापोली : उच्च न्यायालयात दाखल झालेल्या घरपट्टी आकारणी पध्दतीच्या जनहित याचिकेमुळे घरपट्टी वसुली स्थगित असल्याने ग्रामपंचायतींना कारभार हाकताना अनंत समस्या भेडसावत आहेत. या पार्श्वभूमीवर जालगाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेत तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांची मेगा चर्चा घडवून आणली. शिवाय ग्रामपंचायतींवर होणारा अन्याय दूर होण्यासाठी पालकमंत्र्यांसह सर्व यंत्रणांना निवेदन सादर करून पाठपुरावा करण्याचे निश्चित करण्यात आले.
भांडवली मूल्यांकन अथवा चौरस फुटावर घरपट्टीची आकारणी करावी, याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. या याचिकेचा निकाल लागत नाही तोपर्यंत उच्च न्यायालयाने राज्यात सर्व ग्रामपंचायतींना घरपट्टी वसुलीस स्थगिती दिली आहे. एप्रिल २०१५पासून आजतागायत घरपट्टी वसुलीचे काम स्थगित आहे. यामुळे सर्वच ग्रामपंचायतींची विकासकामे रखडली असून, नागरिकांना सुविधा देताना अडथळे येत आहेत. ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांचा पगारही अनेक ग्रामपंचायतींना देणे शक्य नसल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत. घरपट्टी वसुलीला स्थगिती दिल्याने ग्रामपंचायतीचा कारभार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी ही चर्चा आयोजित करण्यात आली होती.
ग्रामपंचायतींकडून यापूर्वी ग्रामविकास विभागाला याबाबत निवेदन देण्यात आले होते. मात्र, न्यायालयाच्या याचिकेमुळे शासन लक्ष देत नसल्याने अवस्था बिकट झाली आहे. यामुळे तालुक्यातील सर्व सरपंचांना एकत्रित करून त्यांचे एक शिष्टमंडळ तयार करण्यात आले आहे. हे शिष्टमंडळ पालकमंत्र्यांसह सर्वांना निवेदन देऊन ग्रामपंचायतींच्या अडचणी मांडणार आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींची विकासकामे घरपट्टी वसुलीअभावी खोळंबली आहेत. जनतेची ही व्यथा शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम तालुक्यातील सरपंचांचे शिष्टमंडळ प्रभावीपणे करणार आहे. या चर्चेत अनेक सरपंच व उपसमित्यांच्या अध्यक्षांनी सहभाग घेतला.
या चर्चेत जालगाव ग्रामपंचायत सदस्य विलास जालगावकर, शिवाजी लिंंगावळे यांनी ग्रामपंचायतींना भेडसावणाऱ्या समस्यांचा उहापोह केला. त्याचप्रमाणे उपस्थित सरपंचांनीही आपल्याला येणाऱ्या अडचणी कथन केल्या. सभागृहात या चर्चेत जालगाव सरपंच रश्मी जालगावकर, उपसरपंच रमेश पाटेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष अशोक जालगावकर, स्वच्छता समिती अध्यक्ष विनोद आवळे यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: All the sarcens gathered together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.