चिपळुणात वर्षा पर्यटनाचे सर्व मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST2021-07-20T04:21:51+5:302021-07-20T04:21:51+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क संदीप बांद्रे/चिपळूण : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या चिपळूण तालुक्यातील वर्षा पर्यटनाचे सर्व मार्ग बंद आहेत. धबधबे, धार्मिक ...

All avenues of rain tourism closed in Chiplun | चिपळुणात वर्षा पर्यटनाचे सर्व मार्ग बंद

चिपळुणात वर्षा पर्यटनाचे सर्व मार्ग बंद

लाेकमत न्यूज नेटवर्क

संदीप बांद्रे/चिपळूण : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या चिपळूण तालुक्यातील वर्षा पर्यटनाचे सर्व मार्ग बंद आहेत. धबधबे, धार्मिक स्थळांवर पर्यटकांअभावी शांतता कायम आहे. परिणामी, येथील पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरून ये-जा करणारे पर्यटक वर्षा पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेतात. त्यामुळे धबधबे, धरणे व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मोठी गर्दी होते. त्यामुळे पावसाळ्यातही पर्यटनातून छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या हातभार मिळतो. मंदिरे आणि घाट रस्त्यातील धबधब्यांच्या परिसरात चहाची टपरी, वडापाव, स्टॉलवाले, तसेच कणीस भाजून विकणारा सामान्य व्यावसायिक या दिवसांची वाट पाहत असतात. त्याशिवाय उपहारगृहे, भोजनालये, तसेच लॉजिंग, निवास व्यवस्थेच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होते, परंतु कोरोनाच्या परिस्थितीमुळे वर्षा पर्यटनाला पूर्णतः ब्रेक लागला आहे. जागोजागी बंदी असल्याने वर्षा पर्यटनाचे बहुतांशी मार्ग बंद झाले आहेत.

सध्या तालुक्यातील सर्वच धार्मिक स्थळे आणि धबधबे बंद आहेत. वर्षा पर्यटनासाठी येणारे लोक प्रामुख्याने परशुराम मंदिर व त्या नजीक असलेला सर्वदूर परिचित सवतसडा धबधबा, डेरवणची शिवसृष्टी, गोविंदगड किल्ला, टेरवची भवानी माता, अडरे धरण, वीर येथील धबधबा आदी ठिकाणी भेटी देतात. मात्र, आता कोरोनाच्या परिस्थितीमुळे या पर्यटन ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सवतसडा धबधब्याच्या ठिकाणी वाढलेली गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तेथे फलक उभारून बंदी घातली. त्यामुळे पर्यटन व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

-------------------------

अनेक जण कर्जात अडकले

नव्याने व्यवसाय करीत असलेल्या पर्यटन व्यवसायिकांनी लाखो रुपयांचे कर्ज काढून, या व्यवसायात उभे राहण्याचा प्रयत्न केला होता. या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, याची चिंता सतावत आहे. हॉटेल व्यावसायिकांचे वीजबिल ५० हजारांहून जास्त आले आहे. हे बिल कसे भरायचे, याची चिंता आहे. हातावरचे पोट असलेले आणि मोठे व्यावसायिक अशा सर्वच पर्यटन व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

----------------------------

काही जण भाजी, मच्छीची विक्री करत आहेत

सध्या कोरोनाच्या परिस्थितीत सायंकाळी ४ वाजेपर्यंत बाजारपेठ खुली असते, तर शनिवारी, रविवारी वीकेंड लॉकडाऊनमुळे केवळ जीवनावश्यक वस्तू विक्रीला परवानगी आहे. त्यासाठी काही पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांनी व्यवसायाचे नवे मार्ग स्वीकारले आहेत. काही जण भाजी व मच्छी घरपोच देण्याचे काम करत आहेत.

-----------------------------

जिल्हाबंदी उठल्यामुळे आता लोक घाटमार्गे ये-जा करू लागले आहेत, परंतु सर्वच पर्यटन स्थळांवर बंदी असून, गर्दीच्या ठिकाणी ग्रामकृती दल व पोलिसांनी लक्ष ठेवले आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी फारसे कोणी जात नाही, परंतु शासनाचे सर्व नियम व अटी पाळून हळूहळू पर्यटनाचे मार्ग खुले करायला हवेत.

- समीर कोवळे, पर्यटन दूत, चिपळूण.

Web Title: All avenues of rain tourism closed in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.