युवकांसह दारू, गाडी जप्त
By Admin | Updated: June 23, 2014 01:38 IST2014-06-23T01:20:26+5:302014-06-23T01:38:32+5:30
रत्नागिरीहून लांजाच्या दिशेने रविवारी पहाटे दुचाकीवरुन ट्यूबमधून गावठी हातभट्टीची दारु घेऊन जाणाऱ्या युवकांनी

युवकांसह दारू, गाडी जप्त
लांजा : रत्नागिरीहून लांजाच्या दिशेने रविवारी पहाटे दुचाकीवरुन ट्यूबमधून गावठी हातभट्टीची दारु घेऊन जाणाऱ्या युवकांनी गस्त घालणाऱ्या उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांच्या गाडीला पाहताच गाडी सोडून धूम ठोकली. मात्र, उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी दारूसह गाडी जप्त केली आहे.
गोवा - मुंबई महामार्गावरून मोठ्या प्रमाणात दारुची वाहतूक होत असल्याने उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ केली होती. याचवेळी लांजा निरीक्षक कार्यालयातील प्रभारी निरीक्षक सूरज दाबेराव, भरारी पथकाचे निरीक्षक प्रमोद कांबळे, उपनिरीक्षक जितेंद्र पवार, सुरेश शेगर, राम पवार, करण धुणावत, शशिकांत पाटील यांचे पथक रविवारी पहाटे लांजाहून पालीच्या दिशेने महामार्गावर गस्त घालत होते. याचवेळी आंजणारी पूल येथे महाराष्ट्र उत्पादन शुल्कची गाडी पाहताच रत्नागिरीकडून येणाऱ्या स्वाराने निवसरमळा येथे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी सोडून धूम ठोकली.
आपली गाडी पाहून मोटारसायकलस्वार गाडी टाकून का पळून गेले, याचे त्यांना आश्चर्य वाटले. पुलावरुन गाडी पुढे नेऊन पाहिल्यानंतर ट्यूबमध्ये ५ हजार रुपये किमतीची १०० लिटर दारु सापडली. पळून जाणाऱ्या युवकाचा शोध घेतला. मात्र, ते कुठेच आढळून आले नाहीत.तत्काळ महाराष्ट्र उत्पादन शुल्कचे प्रभारी निरीक्षक सूरज दाबेराव यांनी होंडा कंपनीची ३० हजारांची मोटारसायकल (एमएच ०७ के ५८५६) व गावठी दारुजप्त केली आहे. मोटरसायकल सोडून धूम ठोकलेल्या व गावठी दारुची चोरटी वाहतूक करणाऱ्या युवकांना उत्पादन शुल्कचे कर्मचारी शोध घेत आहेत.
गेल्या दोन दिवसांत उत्पादन शुल्क विभागाने केलेली ही सलग दुसरी कारवाई आहे. काल रत्नागिरी तालुक्यातील पाली येथे उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत ११ लाख रूपयांचा मद्यसाठा जप्त केला होता. गोवा बनावटीच्या दारूची किती आयात होते, हे यावरून दिसून येते. (प्रतिनिधी)