नगर परिषदेचा होणारा आखाडा
By Admin | Updated: March 1, 2016 00:10 IST2016-02-29T22:37:58+5:302016-03-01T00:10:24+5:30
रत्नागिरी नगरपालिका : नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांमध्ये राजकीय सामना...

नगर परिषदेचा होणारा आखाडा
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. येत्या नोव्हेंबरमध्ये ही निवडणूक होणार असली तरी ही निवडणूक शिवसेना व भाजप मित्रपक्ष यांच्यातच होणार असल्याचे उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट झाले असून, भाजप नगराध्यक्ष महेंद्र मयेकर विरुद्ध सेनेचे उपनगराध्यक्ष विनय मलुष्टे यांच्या नेतृत्त्वाखाली पालिकेतील सेना व भाजपमधील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
पालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आहे. त्यातच युती म्हणून सत्तेवर येताना सेनेतर्फे रत्नागिरीकरांना विकासाचा शब्द देण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या सव्वा वर्षात नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी सेनेची बाजू सांभाळली. त्यानंतर भाजपकडेच रत्नागिरी पालिकेची सत्ता आहे. सेनेलो दिलेला नगराध्यक्षपदाचा शब्द भाजपने पाळला नाही. अल्पमतात असतानाही तांत्रिक कारणामुळे पालिकेत भाजप नगराध्यक्षच आहेत. सेनेचे सभागृहातील संख्याबळ १५ आहे, तर भाजपकडे ८ नगरसेवक आहेत.
उपनगराध्यक्ष निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला राष्ट्रवादीच्या पाचपैकी चार नगरसेवकांनी मतदान केल्याने भाजप व राष्ट्रवादीची जवळीक उघड झाली आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी निवडणूक एकट्याच्या बळावर जिंकण्याएवढी राजकीय ताकद शहरात भाजपकडे व राष्ट्रवादी कॉँग्रेसकडेही नाही. त्यातच सेनेशी पंगा घेतल्याने भाजपला राष्ट्रवादीशी जवळीक करण्याशिवाय पर्याय नाही. अशी आघाडी करून नोव्हेंबर २०१६ ची पालिका निवडणूक जिंकून पुन्हा सत्ता स्थापन करण्याचे भाजप-राष्ट्रवादीचे स्वप्न आहे.
मात्र, युती करून भाजपने सेनेची प्रत्येकवेळी कशी फसवणूक केली, यावर भर देत शिवसेना रत्नागिरीकरांपुढे जाण्यास सज्ज झाली आहे. युती म्हणून दिलेल्या आश्वासनांची पुर्तता होऊ देण्यात भाजपने अडथळे निर्माण केले व विकासकामांना न्याय देता न आल्याने आता शिवसेनेलाच पूर्ण बहुमत द्या, सत्ता द्या, असे आवाहन नागरिकांना करीत भाजपला धोबीपछाड मारण्याच्या तयारीला शिवसेना लागली आहे.
येत्या आठ महिन्यांच्या काळात ज्या ज्या सभा होतील त्या न झालेल्या विकासकामांवरून गाजविण्याचा जोरदार प्रयत्न शिवसेनेच्या नगरसेवकांकडून केला जाणार आहे. त्यासाठीच पालिका कामकाजाचा अनुभव असलेल्या नगरसेवक विनय मलुष्टे यांना शिवसेनेने उपनगराध्यक्षपदावर बसविले आहे. मलुष्टे हे विकास कामांबाबत भांडणारे आक्रमक नगरसेवक म्हणून परिचित आहेत. त्यामुळे येत्या काही काळात शहरातील मूलभूत सोईसुविधांमधील त्रुटी, न झालेली विकासकामे याबाबत पालिका सभांमधून रण माजण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तालुकाप्रमुख असलेले बंड्या साळवीही सभागृहात आहेत. सेनेचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, राहुल पंडित यासारखे अभ्यासू नगरसेवक सेनेच्या ताफ्यात आहेत. (प्रतिनिधी)
खंबीर नेतृत्त्व : मलुष्टे सेनेचे आक्रमक नेते...
उपनगराध्यक्ष विनय मलुष्टे हेही आक्रमक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे नगराध्यक्षांचा ते व्यवस्थित सामना करू शकतात, असा सेनेचा होरा आहे. पालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आली असताना मलुष्टे हे महेंद्र मयेकर यांचा कसा सामना करतात? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
राजकीय खेळीमध्ये हुशार मानले जाणारे भाजपचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर शिवसेनेच्या आव्हानाला कसे सामोरे जाणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेला भविष्यात ते कसे हाताळतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.