गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महामार्गावर मदत केंद्र, तपासणी नाके तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:29 IST2021-09-13T04:29:36+5:302021-09-13T04:29:36+5:30

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कोकणात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखद, विनाअपघात होण्याकरिता जिल्हा पाेलीस दलाने उपाययाेजना राबवल्या आहेत. महामार्ग क्र. ...

Aid center on the highway in connection with Ganeshotsav, checkpoints deployed | गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महामार्गावर मदत केंद्र, तपासणी नाके तैनात

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महामार्गावर मदत केंद्र, तपासणी नाके तैनात

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कोकणात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखद, विनाअपघात होण्याकरिता जिल्हा पाेलीस दलाने उपाययाेजना राबवल्या आहेत. महामार्ग क्र. ६६ (मुंबई ते गोवा) येथे खेड ते रायपाटण या २१३ किलोमीटरवर महामार्गावर २० मदत केंद्रे व ४ तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. ही मदत केंद्रे व तपासणी नाके २० सप्टेंबर २०२१ रात्री ८ वाजेपर्यंत कार्यान्वित राहणार आहेत.

या सर्व मदत केंद्रावर भक्तांच्या माहितीसाठी पोलीस विभाग, नियंत्रण कक्ष, गॅरेज, रूग्णवाहिका, क्रेन यांचे संपर्क क्रमांकाचे बॅनर्स लावण्यात येणार आहेत. उभारलेल्या मदत केंद्रावर ८ पोलीस अधिकारी व ८६ पोलीस अमलदारांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी, महसूल विभागाचे कर्मचारी, प्रादेशिक विभागाचे अधिकारी व कर्मचारी या सर्व खात्यांना नियुक्ती करण्यात आलेली आहे. महामार्गावर कोणत्याही ठिकाणी अपघात झाला तर तत्काळ जखमींना मदत मिळावी याकरिता सरकारी व खासगी रुग्णवाहिका व वैद्यकीय पथके तैनात ठेवण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंडळांना सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील सर्व बसस्थानक व रेल्वे स्थानकांवर बॉम्ब शोधक व नाशक पथकाव्दारे तपासणी करण्यात येत आहे. तसेच रेल्वे पोलीस यांच्याकडूनही रेल्वेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली जाणार आहे. गणपती व गौरी आगमन, विसर्जन व अनंत चतुदर्शी या सर्व दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यातील ताडी-माडी, देशी-विदेशी दारू दुकाने बंद ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्र व्यवहार करण्यात आला हाेता. या पत्राचा विचार करून प्रशासनाने तीन दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उत्सव काळात पोलीस स्थानकातील गुन्हेगारांवर व त्यांच्या हालचालींवर नियमितपणे लक्ष ठेवण्यात येणार आहे. तस्करी, अवैध दारू वाहतूक इत्यादींवर आळा घालण्यासाठी ऑल आऊट ऑपरेशन, कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येणार आहे.

Web Title: Aid center on the highway in connection with Ganeshotsav, checkpoints deployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.