साडेतीन महिन्यांनी विद्यार्थ्यांना आहाराचा घास
By Admin | Updated: September 23, 2014 00:14 IST2014-09-22T22:42:53+5:302014-09-23T00:14:48+5:30
कडवईतील भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना अटकपूर्व जामीन

साडेतीन महिन्यांनी विद्यार्थ्यांना आहाराचा घास
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवईच्या भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या पोषण आहारात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यानंतर मुख्याध्यापक अशोक साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला व ते मुख्याध्यापकपदी रूजूही झाले. या सर्व घडामोडीत विद्यार्थ्यांचा पोषण आहार मात्र गेले साडेतीन महिने बंदच होता. पालकांच्या रेट्यानंतर दोनच दिवसाप्ांूर्वी कडवई, वाणीवाडी येथील एका बचत गटामार्फत हा पोषण आहार चालू करण्यात आला आहे.
शैक्षणिक वर्ष संपले असताना १५ एप्रिल २०१४ रोजी भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या पोषण आहाराच्या खोलीत १३८ पोती तांदूळ, २४० लीटर तेल, डाळी व इतर साहित्य असा मोठ्या प्रमाणावर साठा असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणल्यानंतर कडवईमध्ये खळबळ माजली होती. त्यानंतर हा साठा सील करण्यात आला होता. मात्र, ६ जून २०१४ रोजी पाहणी केली असता चौकशीअंती हा तांदूळ व इतर साहित्य आरवली येथील पाटणकर नामक रेशन दुकानरादाला विकला गेल्याचे उघड झाले.
या सर्व प्रकाराची कल्पना मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार कालम-पाटील यांना दिली असता त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. यानंतर शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापक साळुंखे यांच्याविरोधात तक्रार दाखल होऊन गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्यानंतर साळुंखे यांनी गैरहजर राहून अटकपूर्व जामीन मिळवला. जुलै महिन्यात पुन्हा त्यांच्या हाती मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात आला.
या सर्व घडामोडीत भाईशा घोसाळकर हायस्कूलचे विद्यार्थी मात्र पोषण आहारापासून वंचित होते. भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या मुख्याध्यापकांच्या अखत्यारित पोषण आहार चालवण्यास येथील बचत गटांनी असहमती दर्शवली होती. या कालावधीत ७ जुलै दरम्यान शासनाकडून पोषण आहाराचे साहित्य मागणीप्रमाणे पाठवण्यात आले. मात्र, पोषण आहाराची खोली आजतागायत सील असल्याने हे साहित्य दुसऱ्या एका खोलीत उतरवण्यात आले.
यातील बरेचसे साहित्य खराब झाले असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीने काही दिवसांपूर्वी निदर्शनास आणून दिले होते. याबाबत शिक्षण विभागाशीही संपर्क साधण्यात आला होता. मात्र, या नुकसानीला मुख्याध्यापकच जबाबदार असल्याचे गटशिक्षणाधिकारी पी. एस. पाटील यांनी स्पष्ट केले होते.
पोषण आहार चालू करण्यासाठी ग्रामस्थ आग्रही होते. नुकत्याच झालेल्या एका पालक सभेत पोषण आहार चालू करण्याबाबत एकमत झाले. यावेळी कडवई पाणीवाडी येथील जय हनुमान महिला बचत गटावर हा पोषण आहार शिजवून देण्याची जबाबदारी देण्यात आली. १८ सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येत असल्याने साडेतीन महिन्यांपासून शिक्षण विभाग, संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्या कातडीबचाव धोरणाने उपाशी राहिलेल्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
कडवई येथील हायस्कूलमधील पोषण आहारामधील भ्रष्टाचाराचे हे प्रकरण बाहेर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या मूळाशी जाऊन या प्रकाराची चौकशी करण्यात आली या साऱ्या प्रकारानंतर संबंधित मुख्याध्यापकाने अटकपूर्व जामिन मिळविला. या साऱ्या प्रकारात पोषण आहार विद्यार्थ्यांना बंद होता तो आता सुरू झाला. त्यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)