दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरोग्य केंद्रात प्रसुती
By Admin | Updated: December 5, 2015 00:20 IST2015-12-04T22:46:05+5:302015-12-05T00:20:38+5:30
दुपारी साडेतीन वाजता या महिलेने २.७०० किलो वजनाच्या कन्यारत्नाला जन्म दिला.

दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरोग्य केंद्रात प्रसुती
अमोल पवार -- आबलोली --अनेक वर्षांच्या संघर्षानंतर भातगाव - तिसंग (ता. गुहागर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सन २००५ साली कोळवली येथे स्थलांतरीत झाले. सन २०१०मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामाला सुरुवात झाली. उद्घाटनाची वाट न बघता जनतेच्या सोयीसाठी नवीन इमारतीत आरोग्य केंद्राचे कामकाज आॅगस्ट २०१५मध्ये सुरु करण्यात आले. दुर्गम भागात असलेल्या या आरोग्य केंद्राला पहिल्या प्रसुतीसाठी तब्बल १० वर्षे प्रतीक्षा करावी लागली.
आरोग्य केंद्राचा विस्तार, कार्यक्षेत्र हे दुर्गम, डोंगराळ भागात विस्तारले आहे. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने येथे येणे-जाणे रुग्णांना अवघड बनले आहे. मात्र, दि. ३० नोव्हेंबर रोजी शिवणे - बौद्धवाडी येथील भावना दीपक सुर्वे यांना दुपारी प्रसुती वेदना सुरू झाल्याचे उपकेंद्राच्या आरोग्यसेविका एम. वाय. नाटेकर यांना समजले. त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका मागवून या मातेला आरोग्य केंद्रात आणले. दुपारी साडेतीन वाजता या महिलेने २.७०० किलो वजनाच्या कन्यारत्नाला जन्म दिला. ही प्रसुती आरोग्य केंद्रासाठी ऐतिहासिक असल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. प्रसुती व्यवस्थित पार पाडण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. पी. जांगी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेविका एम. वाय. नाटेकर, एम. बी. जाधव, डी. डी. भोसले यांनी विशेष मेहनत घेतली. माता - बालक दोघांची प्रकृती उत्तम आहे. मात्र, आरोग्य केंद्रात आजही पाणी पुरवठा नाही. या पार्श्वभूमीवर या पहिल्या प्रसुतीला महत्व आहे.