दीड वर्षानंतर रत्नागिरीला नियोजन अधिकारी
By Admin | Updated: July 16, 2016 23:29 IST2016-07-16T22:49:53+5:302016-07-16T23:29:26+5:30
विकासकामांचा प्रश्न दूर : परभणीचे जुंजारे यांच्या नियुक्तीचे जिल्हा प्रशासनाकडे आदेश

दीड वर्षानंतर रत्नागिरीला नियोजन अधिकारी
रत्नागिरी : जिल्ह््याचे नियोजन सांभाळणाऱ्या नियोजन समितीला अखेर दीड वर्षानंतर जिल्हा नियोजन अधिकारी मिळाला आहे. परभणीचे जिल्हा सांख्यिकी अधिकारी सु. ना. जुंजारे यांची रत्नागिरीचे जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा नियोजन अधिकारी विजय आहेर यांची जानेवारी २०१५ मध्ये पुणे विभागाच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या पदाचा तात्पुरता कार्यभार सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी विद्या मोरबाळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. तत्पूर्वी डिसेंबर २०१४ मध्ये सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी विकास सोमण यांची मुंबईला बदली झाल्याने हे पदही रिक्त झाले होते. त्यातच जिल्हा नियोजनचा कारभार सांभाळणाऱ्या विद्या मोरबाळे याही जुलै २०१५अखेर सेवानिवृत्त झाल्या. त्यामुळे पुन्हा जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांचे पद तसेच मोरबाळे यांचे सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पदही रिक्त झाले. हे पद रिक्त होऊन वर्षाचा कालावधी उलटला असून, याबाबत पालकमंत्र्यांच्याकडेही सातत्याने विचारणा करण्यात आली होती. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने वृत्ताच्या माध्यमातूनही पाठपुरावा केला होता. १ जुलैला नियोजन समितीच्या आढावा बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे अखेर रत्नागिरीसाठी जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून सु. ना. जुंजारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गेल्या महिन्यात सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून राजन घोरपडे यांनी पदभार स्वीकारला आहे. अजूनही सहाय्यक नियोजन अधिकाऱ्याचे एक पद व सांख्यिकी अधिकाऱ्यांची दोन पदे रिक्त आहेत. (प्रतिनिधी)